चंदगड /सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील फिरायला गेलेल्या युवकांना मारहाण व लूट प्रकरणाची गोवा सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यामध्ये म्हापसा पोलिसांनी संबधित स्पामधील आणखीन तीन महिलांना ताब्यात घेतले. या संबंधात आज (मंगळवारी दि. ३१ मे रोजी) गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवटे यांनी म्हापसा पोलिस स्थानकाला भेट देऊन पोलीस निरीक्षक परेश नाईक यांना याप्रकरणी कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
चंदगड तालुक्यातील ११ युवक सोमवार (दि. २३ मे) रोजी गोव्याला फिरायला गेले होते. दुसऱ्या दिवशी परत येत असताना म्हापसा बोर्डेश्वर मंदिराजवळील एका स्पामधील अज्ञातांनी सदर युवकांना मारहाण केली. त्यांच्याकडिल सर्व पैसे, सोने तसेच इतर साहित्य जबरदस्ती लुटले. तसेच त्यांचे व्हिडिओ करून त्यांना ब्लॅकमेल केले होते. या प्रकरणानंतर चंदगड पोलिसात सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. तसेच या प्रकरणी म्हापसा पोलिसात गुन्हा दाखल करून काल तिघांना अटक केली होती. तर मंगळवारी पुन्हा तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी
याप्रकरणी म्हापसा पोलिस ठाण्याते पोलिस निरीक्षक परेश नाईक व त्यांच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत सचिन भारद्वाज, मुबारक मुल्ला व आशिष जागिर सिंग या तिघांना अटक केली होती. त्यानंतर आज त्या स्पामधील आणखीन तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता पाचही जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यातील एक महिला फरार असून शोध सुरू आहे. तत्पूर्वी गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवटे यांनी म्हापसा पोलीस स्थानकाला भेट दिली. या प्रकरणी तपासात कोणतीही हयगय न करता दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचना केली. तर अटक आरोपी याआधी अशा सिंडिकेटमध्ये सहभागी होते. आम्ही तपास करतोय अशी माहिती म्हापसा पोलीस ठाण्याचे पीआय परेश नाईक यांनी दिली आहे.
गोवा सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. तसेच पोलीस निरीक्षक नाईक यांनीही कसून चौकशी सुरू ठेवली असल्याने चंदगड तालुक्यातील युवकांसोबतच अनेक पीडितांना न्याय मिळणार असल्याने अँड. संतोष मळविकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment