कर्यात भागात भाताच्या 'कोरवाफ' पेरणीची धांदल - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2022

कर्यात भागात भाताच्या 'कोरवाफ' पेरणीची धांदल

 कालकुंद्री (ता. चंदगड) येथील शिवारात कुरी बैलांच्या साहाय्याने भाताची कोरवाफ पद्धतीने पेरणी करताना शेतकरी कुटुंब.

कालकुंद्री / सी. एल. वृत्तसेवा

          गेल्या चार पाच दिवसात कर्यात भागात भाताच्या कोरवाफ पेरणीची धांदल सुरू आहे. एकाच वेळी पेरणी हंगाम सुरू झाल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत असून पैरा पद्धतीने कामे उरकली जात आहेत.

         चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागात खरीप हंगामाची सुरुवात दरवर्षी भाताच्या धुळवाफ पेरणीने होते. तथापि यंदा गेल्या पंधरा दिवसात झालेल्या दोन मोठ्या पावसांमुळे कालकुंद्री कुदनुर किणी कोवाड, निष्ठूर आदी गावांतील शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साठले. सततच्या पावसामुळे धूळपेरणीला ब्रेक बसला. 

          सध्या मृग नक्षत्रातील पावसाचे हळूहळू आगमन होत असल्याने भागात 'कोरवाफ'  पद्धतीने पेरण्या उरकण्याची लगबग सुरू झाली आहे. ओल्या मातीतून पाच पात्यांची कुरी ओढण्यासाठी शेतकऱ्यांना बैलजोडीचा उपयोग होत आहे. 'कुरी'च्या पेरणीमुळे मोठ्या प्रमाणात श्रम, वेळ व मजुरांची बचत होते. पण यंदा मान्सून पूर्व मोठ्या पावसाने पेरणीपूर्व मशागतीला वेळ न मिळाल्यामुळे बळीराजाच्या अडचणीत भर पडली आहे. धूळ पेरणी थांबली परिणामी कोरवाफ पेरणीसाठी मनुष्यबळ किंवा बैलजोडी नाही. अशा स्थितीत बहुतांशी शेतकऱ्यांनी पावसाळ्यात भात रोप लावणीची मानसिकता केली असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.

           अधिक उत्पन्न व दर देणाऱ्या प्रचलित तसेच नव्या संकरित बियाणांचा शोध घेताना शेतकरी दिसत असून खते व बियाणे खरेदीसाठी कुदनुर कालकुंद्री राजगोळी कोवाड आदी ठिकाणच्या कृषी सेवा केंद्रांत शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे.

No comments:

Post a Comment