बेळगाव येथील चंदगड सोसायटीच्या चेअरमनपदी प्रा. एम. के. पाटील, व्हा. चेअरमनपदी अशोक थोरात - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2022

बेळगाव येथील चंदगड सोसायटीच्या चेअरमनपदी प्रा. एम. के. पाटील, व्हा. चेअरमनपदी अशोक थोरात



कागणी : सी. एल. वृत्तसेवा

 बेळगाव येथील चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटना संचलित चंदगड मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगावच्या 2022 - 2027 या कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर झालेल्या बैठकीत चेअरमनपदी प्रा. एम. के. पाटील ( मुळ - गाव ढोलगरवाडी, चंदगड ) तर व्हाईस चेअरमनपदी अशोक थोरात (मुळ गाव - लकीकट्टे, चंदगड) यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांचे स्वागत करुन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संघटनेतर्फे सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रहिवासी संघटनेचे  सदस्य गंगाराम जी. कंग्राळकर हे  होते.

नूतन चेअरमन प्रा. एम. के. पाटील यांचा सत्कार मधुकर वेसणे यांच्या हस्ते तर व्हाईस चेअरमन अशोक थोरात यांचा सत्कार गंगाराम कंग्राळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

 गंगाराम कंग्राळकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की प्रा. एम. के. पाटील हे गेले वीस वर्षे संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे संघटनेमध्ये कार्य चांगले आहे. त्याचबरोबर सोसायटीमध्ये ही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. सर्व संचालकांच्या सहकार्याने त्यांनी संस्थेचे उद्दिष्ट पार करून अधिकाधिक नफा मिळविला आहे. व्हाईस चेअरमन अशोक थोरात हे तर संस्थेच्या कर्जवसुलीचे कार्य सतत करत आहेत. ते एक उत्तम संघटक आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असेही उदगार त्यांनी काढले.

 यानंतर संघटनेचे सदस्य मधुकर वेसणे आपल्या भाषणात म्हणाले, आतापर्यंत संस्थेच्या कार्यात पारदर्शकता आहे, तसेच यापुढेही राहो आणि संस्थेची भरभराट होवो यासाठी नेहमीच आमचे सहकार्य राहील.

 नूतन चेअरमन प्रा. एम. के. पाटील म्हणाले, आपण जो विश्वास ठेवून माझी चेअरमनपदी निवड केला, त्या विश्वासाला मी पात्र राहीन.  सतत सोसायटीच्या प्रगतीचा आणि हित राखणे हा माझा मानस आहे. यासाठी मी आपणा सर्वांच्या कडून अपेक्षा करतो.

 व्हाईस चेअरमन अशोक थोरात म्हणाले, मी आज पर्यंत संस्थेच्या हितासाठी कार्य केले आहे. तसेच यापुढेही कार्यरत राहीन. हे कार्य तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने पुढे जात आहे. यापुढेही सर्वांनी मिळून प्रगती करू, असे सांगितले.

 त्यावेळी प्रफुल्ल शिरवळकर, सतीश बांदिवडेकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास संचालक विवेकानंद पाटील, पी. सी. पाटील, नेव्हीचे निवृत्त अधिकारी अशोक के. पाटील, मारुती व्ही. गावडे, सुरेश डी. राजगोळकर, महेश पी. क्यतय्यनवर, संचालिका वनिता डी.

पाटील, सुमन एस. लोहार, महादेव भांदुर्गे, मारुती बिर्जे,

 श्रीकांत पाटील, श्रीकांत हदगल, एम. पी. पाटील,  तसेच सोसायटीच्या मॅनेजर छाया पाटील, अकाऊंटंट उमाजी शिरगावकर, ओमकार कर्लेकर आदी उपस्थित होते.

 सूत्रसंचालन रहिवासी संघटनेचे सदस्य डी. बी. पाटील यांनी केले. आभार गंगाराम कंग्राळकर यांनी मानले.



 

No comments:

Post a Comment