कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
रात्रीच्या वेळी सर्पदंश झाल्यास रुग्णाच्या सुरक्षेसाठी अति तात्काळ वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असते. रात्रीच्या वेळी शक्यतो निशाचर मण्यार सापाची भक्ष्य पकडण्यासाठी भ्रमंती सुरू असते. अशावेळी तो मनुष्य किंवा अन्य प्राण्यांच्या संपर्कात आला व समोर हलचाल झाल्यास दंश करू शकतो. हा साप नागापेक्षा तिप्पट विषारी असल्यामुळे तातडीचे उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू अटळ ठरतो. रात्रीच्या वेळी सर्पदंश झाल्यास तो 'मण्यार' चा असण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी रुग्णास हलचाल न करू देता अलगद उचलून उपचारास साठी सर्पदंशावरील उपचाराची सुविधा असलेल्या दवाखान्यात नेले पाहिजे. अशी माहिती ढोलगरवाडी येथील सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील यांनी दिली.
नुकत्याच वाळकुळी (ता. चंदगड) येथील गौरी चंद्रशेखर निकम या सातवीत शिकणाऱ्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तिचा याच मण्यार ने रात्री झोपलेल्या ठिकाणी चावा घेतला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्पमित्र पाटील यांनी चंदगड लाईव्ह तथा सी एल न्यूज च्या वाचकांसाठी ही माहिती दिली.
चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. यात अनेक बिनविषारी सापांसह अतिविषारी मण्यार, नाग, घोणस यांची संख्याही प्रचंड आहे. या सापांचे दंश ही इथली नित्याची बाब असली तरी दुर्दैवाने चंदगड तालुक्यात एकाही रुग्णालयात सर्पदंशावर सक्षम उपचार नाहीत. त्यामुळे रुग्णाला बेळगाव येथील रुग्णालयांत धाव घ्यावी लागते. यात बराच वेळ गेल्यामुळे तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी घडताना दिसतात. वाळकोळी येथील दुदैवी घटनेतून समाजाने धडा घेण्याची गरज आहे. ढोलगरवाडी येथील सर्पालयातून गेली साठ वर्षे प्रबोधन सुरू असले तरी सर्पदंशाबाबत समाजात अजूनही अज्ञान आहे. तालुक्यातील सर्पदंशावरील उपचारांची स्थिती पाहता सर्पदंश झालेल्या रुग्णास बेळगाव येथील मोफत असलेल्या शासकीय जिल्हा रुग्णालय किंवा केएलई हॉस्पीटल मध्ये दाखल करणे उत्तम. असेही शेवटी सदाशिव पाटील यांनी सांगितले.
एकंदरीत तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील उपचाराची चोवीस तास सुविधा करून देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने तालुक्याचे आमदार राजेश पाटील यांनी पुढाकार घ्यावा. अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment