कर्यात भागात 'धूळवाफ पेरणी' ला ब्रेक, काल झालेल्या पावसाचा परिणाम - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2022

कर्यात भागात 'धूळवाफ पेरणी' ला ब्रेक, काल झालेल्या पावसाचा परिणाम

                        काल झालेल्या बेफाम पावसामुळे कालकुंद्री परिसरातील शिवारात साठलेले पाणी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       आठवडाभरात झालेल्या दोन मोठ्या पावसामुळे शिवारात पाणी साठल्याने कर्यात भागातील 'धूळवाफ' पेरणीला यंदा ब्रेक बसला आहे.

         चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागात खरीप हंगामाची सुरुवात दरवर्षी भाताच्या धुळवाफ पेरणीने होते. तथापि यंदा सततच्या पावसामुळे या धूळपेरणीला ब्रेक बसला आहे. तर काल दि.२ रोजी अचानक आलेल्या मोठ्या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीही खोळंबणार  आहेत. मे महिना अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसापूर्वी या भागात दरवर्षी पाच पात्यांच्या 'कुरी' च्या साह्याने धूळ वाफ पेरण्या केल्या जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात श्रम, वेळ व मजुरांची बचत होते. पण यंदा पावसाने बळीराजाच्या अडचणीत भर पडली आहे. धूळ पेरणी बंद झाल्यामुळे आता कोरवाफ पेरणीसाठी मनुष्यबळ किंवा बैलांच्या साह्याने पेरणी करावी लागणार आहे.

          संकरित बियाणांचे धान्य वर्षभर साठवणुकीच्या दृष्टीने अयोग्य ठरत आहे. साठवलेल्या भातात गुणगुणे, सुरूम, टोके, भोंगे सारखी किड पडत असल्याने अशा किडीला प्रतिकार करणाऱ्या पारंपरिक वाणांच्या शोधात अनेक शेतकरी आहेत.

         खरिप हंगामाच्या तोंडावर दिवसागणिक गगनाला भिडणारे खतांचे, किटकनाशके व बियाण्यांचे दर यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला असून याबाबत संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

No comments:

Post a Comment