स्त्रियांनी स्वतःवर लादलेली अनिष्ट बंधने झुगारावीत - सरपंच माधुरी सावंत-भोसले, म्हाळेवाडी येथे महिला मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2022

स्त्रियांनी स्वतःवर लादलेली अनिष्ट बंधने झुगारावीत - सरपंच माधुरी सावंत-भोसले, म्हाळेवाडी येथे महिला मेळावा


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           पती निधनानंतर पत्नीनेच समाजात अपमानीत जीवन का जगायचे?  सती प्रथा जशी बंद झाली तशा कुंकु पुसणे, मंगळसुत्र काढणे यासारख्या अनिष्ठ प्रथा बंद करण्याची वेळ आली असून स्रियांनीच स्वतःवर घालून घेतलेली ही अनिष्ठ बंधने आता झुगारावीत असे प्रतिपादन  सरपंच माधुरी सावंत-भोसले (उत्साळी) यांनी व्यक्त केले. म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायतीमार्फत 'विधवा अनिष्ट प्रथा' या विषयावर उद्‌बोधन करणेसाठी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सौ. सुश्मिता राजेश पाटील होत्या.

                 प्रास्ताविकात एन. आर. पाटील यांनी करून म्हाळेवाडी गाव पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता असून कै. गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील यांच्यापासून नेहमीच अंधश्रद्धेला, चुकीच्या प्रथांना फाटा देत आला असून त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेण्यासाठी हा मेळावा आयोजित केल्याचे सांगितले. सरपंच सी. ए. पाटील यांनी महिलांच्या सन्मानासाठी विधवा अनिष्ठ प्रथा बंदी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पती-पत्नी  दोघांची नावं घरठाण पत्रकी घेण्याचा ठराव ग्रामसभेत केल्याचं  सांगितले. तसेच हे कागदोपत्री न रहाता याची अंमलबजावणी समस्त महिलांनी करून हे ऐतिहासिक निर्णय यशस्वी करावेत असे आवाहन केले. 

          अध्यक्षीय मनोगतात सुस्मिता राजेश पाटील म्हणाल्या, मी पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या कै. सदाशिवराव मंडलिक यांची कन्या असून अगोदरपासूनच या चुकीच्या प्रथांचा विरोध करते. तुम्हीही तुमचा मान - सन्मान, हक्क मिळवा. मी आणि आम.राजेश पाटील हे नेहमी तुमच्या पाठीशी राहू असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. यावेळी कै. गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना उत्तम बाबूराव पाटील यांनी दिलेल्या बक्षीसाने सन्मानित करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विधवा भगिनींच्या उपस्थितीत हळदी कुंकु कार्यक्रम करण्यात आला.

             या मेळाव्याला श्रीमती इंदुताई पाटील, ग्रामसेवक रविराज चिलमी, उपसरपंच विजय मरणहोळकर, ग्रामपंचायत सदस्य शांता नांदवडेकर, कल्पना पाटील, अनिता पाटील, तंटामुक्त अध्यक्ष वसंत तुकाराम पाटील, पोलिस पाटील जगदीश पाटील, दयानंद शंकर पाटील, सुभाष नांदवडेकर, तुकाराम कांबळे, पुंडलिक गावडे, सुधीर कांबळे , रमेश पाटील, मनोहर पाटील, अर्जुन नांदवडेकर आदी  सह गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.ग्रामपंचायत सदस्या अमृता कांबळे यांनी सुत्रसंचलन केले तर निंगाप्पा दळवी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment