केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा आज दि. १५ जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र सन २०२२-२३ या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या दृष्टीने हा आनंदोत्सवाचा दिवस ठरला. चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कुदनूर, कालकुंद्री, कोवाड या तीन केंद्रांतर्गत गावोगावी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे बैलगाडीसह विविध वाहनातून शाळेपर्यंत मिरवणुकीने नेऊन जंगी स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहार बरोबर विद्यार्थ्यांना लाडू जिलेबी शिरा असे गोड पदार्थ खाऊ देण्यात आले. कोवाड केंद्रातील दुंडगे, चिंचणे, जकनहट्टी येथे विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर, बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. अन्य शाळांत विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. काही वर्षापूर्वी शाळेच्या पहिल्या दिवशी दिसणारे बालकांची रडारड धाकदपटशा, बळजबरीने ओढत बालकांना शाळेत नेणे असे चित्र कुठेच आढळले नाही. ऊलट विद्यार्थी उत्साहाने शाळेत उपस्थित होऊन पहिल्या दिवसापासून ज्ञानाचे धडे गिरवताना दिसले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची ९५ टक्के पेक्षा अधिक उपस्थिती होती. शिक्षण विभाग पंचायत समिती चंदगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुट्टी पूर्वी सर्व शाळांतून इयत्ता पहिलीत दाखल होणारी मुले व पालकांचा शाळा पूर्वतयारी मेळावा घेतला होता. तर दुसरा मेळावा शाळेच्या पहिल्याच दिवशी घेण्यात आला. यालाही पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला. पहिल्या व दुसऱ्या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख चढता राहिल्याचे शाळांच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. केंद्र शाळा कोवाड येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत सरपंच अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व फुले देऊन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील यांनी केले. पालक तथा एलआयसी प्रतिनिधी जीवन पाटील (कालकुंद्री) यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी देण्यात आली. केंद्रातील मलतवाडी, कामेवाडी, किणी, तेऊरवाडी, घुल्लेवाडी, निट्टूर तर यासह कालकुंद्री व कुदनूर केंद्रातील सर्वच शाळांमध्ये विविध उपक्रमांनी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. सुधीर मुतकेकर केंद्रप्रमुख कोवाड, बाळू प्रधान केंद्रप्रमुख कालकुंद्री, रामचंद्र मोटूरे केंद्रप्रमुख कुदनूर यांनी शाळा प्रवेशोत्सव, पटनोंदणी व पहिल्या दिवसाची उपस्थिती यांचा आढावा घेतला. याकामी गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार यांचे मार्गदर्शन लाभले. |
No comments:
Post a Comment