धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना बसवू नका! विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य - शिक्षणाधिकारी आशा उबाळे - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2022

धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना बसवू नका! विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य - शिक्षणाधिकारी आशा उबाळे

चंदगड तालुक्यातील अल्पदृष्टी विद्यार्थ्यांसाठी 'लार्ज प्रिंट पाठ्यपुस्तके' वाटप करताना शिक्षणाधिकारी आशा उबाळे, गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार आदी मान्यवर सहविचार सभेत उपस्थित मुख्याध्यापक
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
   विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्यामुळे जिल्ह्यातील ज्या शाळा नादुरुस्त, धोकादायक असतील  अशा वर्गात विद्यार्थ्यांना अजिबात बसवू नका. त्याऐवजी सुरक्षित खोलीत दोन वर्ग एकत्र करणे, भाडोत्री खोलीत किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी वर्ग बसवणे आदी उपाययोजना करावी. असे आवाहन जिप. प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी केले. त्या न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे शिक्षण विभाग जिप. कोल्हापूर व पंस. चंदगड आयोजित मुख्याध्यापक सहविचार सभेत मार्गदर्शन करत होत्या.
   स्वागत व प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांनी केले. यावेळी पुढे बोलताना उबाळे म्हणाल्या मुलांचे इंग्रजी बोलणे सुधारायचे असेल तर त्यांना रोज एक तास इंग्रजी ऐकवा. चंदगड तालुका शिष्यवृत्तीत अग्रेसर होण्यासाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करावे असे आवाहन केले. शिक्षक पदोन्नती, बदल्या, उशिरा होणारे पगार, पाठ्यपुस्तके वाटप, ग्रामपंचायतीं कडून न भरली जाणारी वीज बिले आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्या हस्ते समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण अंतर्गत चंदगड तालुक्यातील अल्पदृष्टी विद्यार्थ्यांसाठी 'लार्ज प्रिंट पाठ्यपुस्तक' संचाचे वाटप करण्यात आले. आसगाव शाळेचे मुख्याध्यापक वाय एस पाटील यांनी हे संच स्वीकारले. जिप. शिक्षण विस्तार अधिकारी ठोकळ यांनी कोल्हापूर जिप. संचलित राज्यातील एकमेव असलेल्या शिंगणापूर क्रीडा प्रशालेत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील चमकू शकतील असे विद्यार्थी शालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून शोधून त्यांना प्रशालेत दाखल करावे असे सांगताना
 राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना,  शालेय अभिलेखे कसे ठेवावे याबाबतचे मार्गदर्शन केले.
 यावेळी जिप. शिक्षण विस्तार अधिकारी आर डी पाटील, मुसा सुतार आदींसह तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीआरसी विषय तज्ञ सुनील पाटील यांनी केले. केंद्रप्रमुख वाय के चौधर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख बाळू प्रधान, बीआरसी विषयतज्ञ महादेव नाईक, स्वाती चौगुले, भाऊ देसाई आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment