रयत 'ने दिला धनगरवाड्यातील मुलांना छत्रीचा आधार, शाळेच्या पहिल्या दिवशी डोकीवर खोळ ऐवजी मिळाली छत्री - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2022

रयत 'ने दिला धनगरवाड्यातील मुलांना छत्रीचा आधार, शाळेच्या पहिल्या दिवशी डोकीवर खोळ ऐवजी मिळाली छत्री

शाळेच्या पहिल्या दिवशी डोकीवर खोळ ऐवजी मिळाली छत्री


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

            डोंगर माथ्यावर वसलेले पंधरा एक घरांच्या वस्तीचे व जवळपास चाळीस -पन्नास लोकसंख्याचे धनगरवाडे. चंदगड तालुक्यातील सतरा धनगरवाडे स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मुलभूत सोयी पासून लांबच आहेत. आज सुद्धा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी रस्त्याची सोय नसल्यामुळे 8 -10 किलोमीटर चालत जाऊन कामे करावी लागतात.  पक्का रस्ता, शुद्ध पाण्याची सोय, आरोग्याच्या सोयी यापासून हे धनगर वाडे दुर्लक्षितच आहेत. अशाही परिस्थितीत गावातील मूल उन्हाळयात डोक्यावर उन्हाची कायली सोसत व पावसाळ्यात पायात चिखलवाट तुडवत आणि मुसळधार पावसाशी संघर्ष करत आजही येथील मूल मुली शाळा शिकून मोठे होण्याचे डोळ्यात स्वप्न पाहत रोज आठ -दहा  किलोमीटरची पायपीट करीत आहेत.

          चंदगडच्या पश्चिम भागात घन दाट जंगल असल्यामुळे मुसळधार पाऊस कोसळत असतो मध्ये ओढ्याना पाणी येते. सोसाट्याच्या वाऱ्यात मुले प्लॅस्टिक खोळ घेऊन चालत जातात. ही परिस्थिती ओळखून दाटे येथील रयत सेवा फौंडेशनने काजिर्णे, जगमहट्टी, कानूर, पुंद्रा, बुझवडे, कळसगादे येथील धनगर वाड्या वरच्या मुलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

        या गावातील लोक आपला पारंपरिक गवळी व्यवसाय करीत असूनसुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी चाललेली पालकांची धडपड व या कोवळ्या मुलांची जिद्द पाहून स्वातंत्र्याच्या तब्बल ७५ वर्षांनी नुकताच रयत फौंडेशनच्या अथक प्रयत्नाने काजिर्णे व कलिवडे या गावासाठी एक सरकारी अंगणवाडी सुरू करण्यात आली.  या अंगणवाडीच्या माध्यमातून आता येथील मुलांना लहानपणापासून शाळेची ओळख होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर हीच अंगणवाडी आता गावातील मुलांसाठी अभ्यासाचे केंद्र बनले असून गावातील मुले रात्री अभ्यासासाठी नियमित उपस्थित असतात.

          या भागातील शालेय मुलांच्या संपूर्ण विकासासाठी काम करण्याचे ध्येय असून शिक्षणाबाबतीत कसलीही अडचण असल्यास फाऊंडेशनशी संपर्क करावा असे आवाहन फौंडेशनचे संस्थापक मंत्रालयीन कक्ष अधिकारी घनशाम पाऊसकर यांनी यावेळी केले आहे.

       यावेळी ज्ञानेश्वर गावडे, मारुती किंदळेकर, सरदार जाधव, मनोज खरुजकर, ऋषिकेश सातार्डेकर, आकाश गावडे, धोंडीबा येडगे, कोंडीबा येडगे, कविता येडगे, जगन्नाथ यमकर, देहू यमकर, बाबू पाटील, सिध्दू यमकर, लक्ष्मण कोकरे, जानू यमकर, प्रतिक्षा यमकरसह काजीर्णे ग्रामस्थ यासहित नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment