खतांचा मुबलक साठा उपलब्ध करून बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा..! - तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2022

खतांचा मुबलक साठा उपलब्ध करून बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा..! - तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मागणीचंदगड / जाफराबाद : सी एल वृत्तसेवा

         सध्या खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. बाजारपेठेतील खतांच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींत भर पडत आहे. दरवर्षी बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची मेहनत व पैसा वाया घालवणारे काही भामटे यावर्षी पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यांना शोधून कडक कारवाई करावी. अशी मागणी हर्षल पाटील, फटाद यांनी तालुका कृषी अधिकारी जाफराबाद, जिल्हा जालना यांच्याकडे केली आहे. 

         पेरणी हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या खतांच्या तुटवड्यामुळे पेरणी कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खतांचा तुटवडा भासत असल्याचा गैरफायदा घेत कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची लुट सुरू आहे. अशा केंद्र चालकांवर कारवाई करुन परवाना रद्द करावा. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवून तसे आढळल्यास विक्रेता  व बियाणे कंपनीवर कारवाई करावी. अशा आशयाचे निवेदन हर्षल पाटील फटाद (ता. जाफराबाद, जि. जालना) यांनी तालुका कृषी अधिकारी यांना सादर करुन खतांचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी कृष्णाजी माकोडे, उमेश फदाट, मयुर बोरगावकर, रविराज जाधव, रवी फदाट, संदेश फदाट, यांची उपस्थिती होती.  

         चंदगड लाईव्ह न्यूज चॅनेलचे वाचक कोल्हापूर व अन्य जिल्ह्यांसह मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे तिकडून आपल्या भागातील बातम्या सी. एल. न्यूजला याव्यात अशा प्रकारची विनंती नेहमी केली जाते. तिकडील वाचकांच्या आग्रहास्तव सी. एल. न्यूजने ही बातमी प्रसिध्द केली असली तरी राज्यातील अनेक जिल्हे व  तालुक्यांत वरील स्थिती असू शकते. त्यामुळे संबंधित विभागाने दक्ष राहून चुकीच्या गोष्टींना आळा बसेल अशी उपाय योजना करुन शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा.

No comments:

Post a Comment