सुळये येथील आपदग्रस्तांना मदत करताना तूर्केवाडी येथील तरुण मस्ती की पाठशाळा व सुजान फाउंडेशनचे तरुण. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
सुळये (ता. चंदगड) येथील आपातग्रस्त माने कुटुंबियांना तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील इयत्ता दहावी वर्ग मित्र २००३ बॅचच्या मस्ती कि पाठशाळा वर्गमित्र ग्रुप व सुजान फाउंडेशन ग्रुप तूर्केवाडी यांच्यावतीने १५ हजारांची मदत करण्यात आली. चंदगड तालुका पत्रकार संघटनेचे सदस्य सागर चौगुले यांच्या पुढाकाराने सुळये येथील आपद्ग्रस्तांना ही आर्थिक मदत देण्यात आली.
सुळये येथील नागोजी माने या कुटुंबप्रमुखाचे काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात म्हातारी आई, पत्नी व तीन लहान मुले असून बिनभिंतीच्या झोपडीत दिवस कंठत होती. कुटुंबीयांच्या हालाखी बाबतचे व्हीडीओ वृत्त चंदगड तालुक्याचे मुखपत्र चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित चंदगड लाईव्ह तथा सी. एल. न्युजने व्हिडिओसह प्रसारित करुन या कुटुंबाला सर्वप्रथम रोख रुपये ५ हजार मदत देऊन आधार दिला होता. त्यानंतर काही व्यक्ती व संघटनांनी मदतीचा हात पुढे केला. आज २६ जून लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी तुर्केवाडी येथील समाजकार्याला वाहून घेतलेल्या तरुणांनी सुळये गावात जाऊन रु १० हजाराची रोख मदत व ५ हजार रुपयांचे जीवनावश्यक साहित्य दिले. यामध्ये मुलांना रेनकोट, छत्री, कपडे, शैक्षणिक साहित्य अशी मदत केली. 'देवानं दिलंय त्यातलं इतरांना थोडं देऊन पहावं, देव होता नाही आलं तरी माणूस होऊन जगावं' ही उक्ती सार्थ ठरवली.
याप्रसंगी मंडळाचे सदस्य विनोद पाटील, कोरोना योद्धा रमेश देसाई, रवींद्र कोनेवाडकर, सागर चौगुले, बजरंग पाटील, सत्यजित मळवीकर, पत्रकार संघाचे खजिनदार तथा सी. एल. न्युजचे संपादक संपत पाटील उपस्थित होते. या कामी सेनादलातील दौलत पाटील, भरमु गावडे, सोमनाथ सुतार, महेश बसर्गेकर, शिवाजी मसुरकर, ओमान देशात असणारे चंदन बांदिवडेकर आदी वर्ग मित्रांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रुपने आतापर्यंत केलेली मदत
२०१९ साली कलिवडे येथील पूरग्रस्त सावित्री कदम यांना १० हजाराची मदत, २०२० ला कोरोना काळात प्राण गमावलेला सलून दुकान चालवणारा मित्र ज्ञानेश्वर राशिवडेकर त्याच्या परिवारासाठी केलेली २० हजाराची मदत, २०२१ ला तडशिनहाळ येथील मोहन कांबळे यांच्या कुटूंबियांना केलेली १८ हजाराची मदत, तसेच कोरोनाने आईवडिलांविना पोरक्या झालेल्या तडशिनहाळ येथील मुलांना दिलेली शैक्षणिक साहित्याची मदत. या वर्गमित्रांनी यापूर्वीही अनेक आपदग्रस्त कुटुंबांना मदत केली आहे.
आपली छोटीशी मदत
एखाद्या कुटुंबाला निवारा देवू शकते, दानशुर व्यक्तींनी मदत करण्याची गरज
No comments:
Post a Comment