कालकुंद्री (ता. चंदगड) येथे वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करताना महिला. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात गावोगावी विवाहित महिलांमध्ये वटसावित्री व्रताचा उत्साह दिसून आला. आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. हिंदू पंचांगातील जेष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला सुवासिनी महिला वटपौर्णिमा तथा वटसावित्री व्रत करतात. तालुक्यातील सर्वच गावात महिला वडाच्या झाडाचे पूजन करून झाडाभोवती सात फेर्या मारताना दिसल्या. यानिमित्त वडाच्या झाडाचे महत्व व पर्यावरण संतुलन राखण्यात झाडांची भूमिका अधोरेखित होत असते.
या व्रताची आख्यायिका अशी, 'अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. उपवर झाल्यावर राजाने तिला आपला पती स्वतः च निवडण्याची मुभा दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शालव राज्याच्या धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपली राणी व मुलासहित तो जंगलात राहत असे. सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच आहे. हे भगवान नारदाला माहित होते. ही गोष्ट त्यांनी सावित्रीला सांगून सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला दिला. तथापि तिने तो अमान्य केला. विवाह करून ती नवऱ्याबरोबर जंगलात राहून सासू-सासर्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू तीन दिवसावर येऊन ठेपला, तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून व्रत केले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला तेव्हा त्याच्या सोबत गेली.
लाकडे तोडता त्याला घेरी येऊन तो जमिनीवर पडताच यमराज तिथे आले. सत्यवानाचे प्राण नेऊ लागले, तेव्हा सावित्री यमाच्या मागेमागे आपल्या पतीसोबत जाऊ लागली. अनेक वेळा सांगुनही तिने परत जाण्याचे नाकारुन पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर यमाने कंटाळून तिला पती व्यतिरिक्त कोणतेही तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे पुन्हा यावे, आपले गेलेले राज्य परत मिळावे व आपल्याला पुत्र व्हावा असे वर मागितले यमराजाने अनवधानाने तथास्तु म्हटले. त्याला नाईलाजास्तव सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले होते. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया तीन दिवस उपवास करून (शक्य नसल्यास एक दिवस) वडाच्या झाडाची पूजा करून नैवेद्य दाखवतात. पतीला आरोग्यदायी उदंड आयुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करतात.' अशी आख्यायिका आहे.
वटसावित्री व्रतानिमित्य चंदगड तालुक्यात गावोगावी महिला वडाची पूजा करण्यात मग्न असलेल्या दिसत होत्या. यात सुशिक्षित महिलांची संख्याही लक्षणीय होती.
No comments:
Post a Comment