इचलकरंजी येथे मराठा सेवा संघ सर्व कक्षांची रविवारी बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2022

इचलकरंजी येथे मराठा सेवा संघ सर्व कक्षांची रविवारी बैठक


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        कोल्हापूर जिल्हा मराठा सेवा संघ व मराठा सेवा संघ प्रणित सर्व कक्षांची  बैठक रविवार दि. ०३  जुलै २०२२ रोजी दुपारी ३-३० ते ६-३० वाजता मराठा मंडळ सांस्कृतिक भवन, भवानी मंदिर शेजारी, तांबे माळ, इचलकरंजी येथे बोलावण्यात आली आहे.

        बैठकीत सर्व विभागांच्या कार्याचा आढावा, सुचना, अडचणी जाणून घेणे, मराठा समाजाच्या उन्नतीसाठी शासकीय निमशासकीय स्तरावरील योजना माहिती व अंमलबजावणी बाबत चर्चा तसेच मराठा तरुणांना नोकरी, उद्योग, व्यवसायांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी सर्व कक्षांचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते हितचिंतक तसेच मराठा समाजातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहावे. असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर व प्रवक्ते शहाजी देसाई यांनी केले आहे.

        इचलकरंजी शहराचे नुकतेच नगरपालिकेतून महानगरपालिकेत रूपांतर झाले आहे. मोठे औद्योगिकीकरण असलेले हातकणंगले तालुक्यातील हे  प्रमुख शहर आहे. येथे १२ ते १४ एप्रिल २००३ या कालावधीत मराठा सेवा संघाचे ३ दिवसीय निवासी स्वरूपाचे भव्यदिव्य वैभवशाली सिंहावलोकन शिबिर  यशस्वीरित्या पार पडले होते. त्यामुळे सेवा संघाच्या इतिहासात इचलकरंजी शहराची उल्लेखनीय नोंद आहे. महाराष्ट्राचे मॅंचेस्टर असलेल्या इचलकरंजी व उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या हातकणंगले तालुक्यात मराठा समाजाची सर्वांगीण उन्नती हा महत्त्वाचा उद्देश या बैठकीमागे आहे. याकरिता संघटनेत नव्याने सहभागी होऊ इच्छिणांऱ्या मराठा समाजातील समस्त बंधू-भगिनींनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे.

No comments:

Post a Comment