अलबादेवी आपदग्रस्त शेतकऱ्याला ३० हजारांची मदत, सी एल न्यूजच्या आवाहनाला प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2022

अलबादेवी आपदग्रस्त शेतकऱ्याला ३० हजारांची मदत, सी एल न्यूजच्या आवाहनाला प्रतिसाद



चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        अलबादेवी (ता. चंदगड) येथील शेतकरी  सुरेश कृष्णा घोळसे  यांच्या गोठ्यात बांधलेल्या बैलांची दावी एकमेकांत अडकल्याने फास लागून दोन्ही बैल मृत्युमुखी पडले. यात त्यांचे किमान ८० हजार रुपयांचे नुकसान झाले होते. काल ३० जून रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेची बातमी कालच संध्याकाळी चंदगड तालुक्याचे मुखपत्र असलेल्या चंदगड लाईव्ह न्यूज तथा सी. एल. न्यूजने प्रसिद्ध केली होती. 

        सर्वत्र व्हायरल झालेली ही बातमी वाचून आपदग्रस्त शेतकरी सुरेश घोळसे यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले. यात पुणे व मुंबई स्थित अलबादेवी ग्रामस्थ, स्थानिक गावकरी, गावातील हायस्कूल मार्फत मदत निधी जमा करण्यात आला. बघता बघता ५० हजारांची मदत जमा झाली. ती आज सुरेश घोळसे यांना सुपूर्त करण्यात आली. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या गरीब व कष्टाळू घोळसे कुटुंबीयांना या मदत निधीने दिलासा मिळाला असून नवीन बैल जोडी खरेदी करून आपल्या संसाराचा गाडा ते पुन्हा नेटाने हाकू शकतील. 

           मदत निधी प्रदान प्रसंगी या दुर्दैवी घटनेची बातमी तात्काळ देणाऱ्या चंदगड तालुका पत्रकार संघ संचालित सी. एल. न्यूज चॅनेल व देणगीदारांबाबत सुरेश व त्यांच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

No comments:

Post a Comment