वाहतुकीला खुला झालेला पुल |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
१० जुलै पर्यंत चंदगडच्या दोन्ही पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले व्हावेत. यासाठी आंदोलन करणाऱ्या अॅड. संतोष मळवीकर यांच्या प्रयत्नाला यश आले. तिलारी, गारगोटी हायवे लिमिटेड कंपनीने मदरसा आणि सोयरीक समोरील दोन्ही पूलाचे काम पूर्ण करून वाहतूकीसाठी सोमवार (ता. ११) पासून खुले केले आहे.
अडकुर ते कोदाळी पर्यंत रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू होते. यावेळी अॅड. संतोष मळवीकर यांनी याविरुद्ध जोरदार आंदोलन छेडले होते. आंदोलनाचा परिणाम म्हणून चंदगडचे उप अभियंता करांडे यांनी अधिकाऱ्यांसोबत इंजिनियर एस. एफ. चौगुले यांची बैठक बोलावली. सविस्तर चर्चा करून पहिल्या कामाचा ठेका असणाऱ्या सिंग यांच्याकडून कायदेशीर पूर्तता करून तिलारी गारगोटी हायवे लिमिटेड कंपनी यांनी एप्रिल मध्ये ठेका घेतला. १० जुलैच्या अगोदर मदरसा आणि सोयरीक समोरील दोन्ही पुलांचे काम उत्कृष्ट करून वाहतूक सुरू केली जाईल व तात्पुरता डांबरीकरणाची साईड पट्टी करण्याचे लेखी आश्वासन एस. एफ. चौगुले यांनी ॲड. मळवीकर यांना दिले होते. या शिवाय हेरे ते कोदळी पर्यंतचा रस्ता ऑक्टोंबर पासून सुरु करणार असून तोपर्यंत डांबरीकरण साईट पट्ट्यांची तात्पुरता सोय करण्याचे आश्वासन देखील दिले होते.
त्यानुसार साईड पट्ट्यांची तात्पुरता सोय केलेली असून दोन्ही पूल कालपासून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. मार्चमध्ये ठेका मिळाल्या कारणाने कामाला विलंब झाला असला तरी येणाऱ्या ऑक्टोंबर पासून मार्च पर्यंत सर्व रस्त्याचे उत्कृष्ट प्रकारचे काम करण्याची व दहा वर्ष तो रस्ता देखभाल दुरुस्ती करण्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीची राहील असे एस. एफ. चौगुले यांनी सांगितले. दोन्ही पुल वाहतुकीसाठी खुली झाल्याने नागरीकांची सोय झाली आहे.
No comments:
Post a Comment