चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2022

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण

वृक्षारोपन करताना मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुरच्या व्यापक स्तरावर वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अंतर्गत र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे दि. 6 व 7 जुलै 2022 रोजी वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने स्वयंसेवकांनी पारंपरिक दुर्मिळ विविध जातिच्या वनस्पती व फळझाडांची लागवड केली. यामध्ये हिरडा, बेहडा, हेळा, करंज, धामण, जांभुळ, सिसम, आसन, बावा, शिरस, आंबा, फणस, आवळा इ. प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

        वृक्षारोपणानंतर झालेल्या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख  पाहुणे सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल सुनिल नागवेकर यांनी  स्वयंसेवकांना विविध वृक्षांची ओळख, त्यांची स्थानिक नावे, औषधी उपयोग, जमिनिचा पोत सुधारणे व ओलावा टिकवून ठेवण्यासाठी व मानव आणि वसुंधरेच्या आरोग्यासाठी झाडांचे किती मोलाचे योगदान आहे, हे समजावून दिले. वनरक्षक रवी पाटील यानी जमीनीची धुप व वाढते तपमान रोखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्व सांगत, पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने उचलने काळाची गरज असल्याचे सांगितले.

           प्रकल्प अधिकारी व कोल्हापुर जिल्हा समन्वयक प्रा. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबविण्यात आली. प्रास्ताविक प्रा. व्हि. के. गावडे यांनी केले. प्रा. आर. एस. पाटील यांनी आभार मानले. उपक्रम यशस्वीतेसाठी प्रा. ए. डी. कांबळे, डॉ. शाहू गावडे, आर एस पाटील, शिवराज हासुरे, अनिल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी डॉ. के. एन. निकम सर्व स्टाफ व स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment