|
तेऊरवाडी येथे ३०० ग्रामस्थ एकत्र येऊन रोप लागण करतानाचे दृष्य |
तेऊरवाडी / एस. के. पाटील
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे तब्बल ३०० ग्रामस्थांनी एकत्र येत नियोजनबद्ध विविध गाणी गायनाचा आनंद लुटत चार एकर क्षेत्रावर चिखल केला. एवढेच नाही तर केवळ तीन तासात रोप लागणही पूर्ण करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे गाव करील ते राव काय करील? याचा प्रत्यय संपूर्ण तेऊरवाडी ग्रामस्थांनी सर्वासमोर ठेवला आहे.
शहरातील संस्कृती गावामध्येही आलेली आहे. प्रत्येक जन आपआपल्या कामामध्ये व्यस्थ असल्याने ऐकमेकांकडे लक्ष द्यायला व मदतही करायला कोणाला वेळ नाही. पूर्वी तेऊरवाडीमध्ये शेतीच्या कामासाठी विनामुल्य पावनेर करून सर्व शेतकरी एकमेकांच्या शेतीकामासाठी मदतीला धावून जात असायचे. पण आता विविध कारणांनी शेती व्यवसाय धोक्यात आल्याने मदतीला कोण धावत नाही अशातच तेऊरवाडी सारख्या गावामध्ये नोकरदारांची संख्या अधिक असल्याने व वारंवार होणाऱ्या गव्यांच्या त्रासाने अनेकांची शेती पड पडली आहे.
अशीच गावच्या देवस्थानाची भात जमिन पड पडली होती. पण ग्रामस्थांनी गावच्या सहकार्याने या जमिनित रोप लागणीचा निर्णय घेऊन आज प्रत्यक्ष रोप लागण केली. यासाठी गावातील १९० महिला व ११० पुरुष सहभागी झाले होते. यामध्ये शेतकऱ्यांबरोबरच सर्व माहिला, शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षक, निवृत्त सैनिक, पोलीस, नोकरी करणाऱ्या अशा सर्वानिच रोप करण्यासाठी योगदान दिले. यावेळी महिला वर्गाने गीत गायन करत रोपेचा आनंद लुटला. आजच चिखल करणे ते पण बैलानी, रोप काढणे व ती लागण करणे अशी सर्व कामे केवळ तीन तासात संपवून शेवटी शिऱ्याचा सर्वानी आस्वाद घेतला. गावची ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी बिनविरोध करून सर्वासमोर आदर्श ठेवलेल्या तेऊरवाडीने विकास कामातही आघाडी घेतली आहे. आजच्या या रोप लागणीमध्ये पुन्हा एकदा तेऊरवाडी ग्रामस्थांचे एकीचे बळ दिसून आले हे मात्र निश्चित. या आगळ्या वेगळ्या रोप लागणीची चर्चा कोवाड परिसरात होत आहे.
No comments:
Post a Comment