अन्नधान्यावरील जीएसटी कर गरिबांच्या तोंडातील घास काढून घेणारा..! प्रस्तावित कराच्या निषेधार्थ कोवाड परिसरात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2022

अन्नधान्यावरील जीएसटी कर गरिबांच्या तोंडातील घास काढून घेणारा..! प्रस्तावित कराच्या निषेधार्थ कोवाड परिसरात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

अन्नधान्यावरील प्रस्तावित ५ टक्के जीएसटी रद्द करावा मागणीसाठी कोवाड व्यापारी संघटनेच्या वतीने शासनाला निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

            शासनाने जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्यावर जीएसटी कर लागू करण्याचे धोरण ठरवले आहे. या प्रस्तावित कराच्या निषेधार्थ कोवाड व कुदनूर (ता. चंदगड) परिसरातील किराणा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. बंदमुळे ग्राहकांची काही प्रमाणात कुचुंबना झाली असली तरी व्यापाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेतून या अन्यायकारक कराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अन्नधान्यावर असा कर लादून गोरगरिबांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचे महापातक हे सरकार करत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

            प्रस्तावित ५ टक्के जीएसटीचा निर्णय शासनाने तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी कोवाड व्यापारी संघटना आजच्या भारत बंद मध्ये सहभागी झाली. किराणा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने दिवसभर शंभर टक्के बंद ठेवली. संघटनेच्या वतीने सकाळी सर्कल व तलाठी कार्यालयावर मोर्चा ने जाऊन निवेदन देण्यात आले. तलाठी राजश्री पचंडी यांनी निवेदन स्वीकारले.

            सर्वसामान्य जनतेची प्राथमिक गरज असलेल्या अन्नधान्यावर शासनाने लागू केलेला जीएसटी हा अत्यंत अन्यायकारक, गोरगरीब जनतेला महागाईच्या खाईत लोटणारा, गरिबांच्या रोजी रोटी वर घाला घालणारा आहे. किंबहुना सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडातील घास हिसकावून घेणारा तुघलकी निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील गोरगरिबांची प्राथमिक गरज लक्षात घेऊन अन्नधान्यावर लावलेला जीएसटी कायदा तात्काळ रद्द करुन जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम, उपाध्यक्ष कल्लापा वांद्रे, पदाधिकारी चंद्रकांत कुंभार, सचिन गजरे, शामराव पाटील, वैजनाथ पाटील, जोतिबा वांद्रे, जगन्नाथ अंगडी, मालिकार्जुन वाली, सोमनाथ महागावकर आदींसह व्यापारी व नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment