बंडखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कांगो येथील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवताना मराठा रेजिमेंटचे जवान.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
नुकत्याच दक्षिण आफ्रिकेतील गणराज्य कांगो येथे बंडखोरांनी कांगो मिलिटरी, नागरी वस्ती व शांती सेनेवर रॉकेट लॉन्चर व बोफोर्स तोफ गोळ्यांनी हल्ला केला. यात अनेक कांगो नागरिक ठार तर कित्येक जखमी झाले. हा घातक हल्ला परतवून लावण्यासाठी शांती सेनेला पाचारण करण्यात आले. शांती सेनेत अग्रभागी असलेल्या सेवन मराठा रेजिमेंट च्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशी युद्ध गर्जना करत गनिमी काव्याने शेकडो हल्लेखोरांना कंठस्नान घातले. त्यांचे हल्ले परतवून लावत संकटात सापडलेल्या कांगो नागरिकांना आरोग्य सुविधा व अन्न पूरवून त्यांचे जीव वाचवले. या कामगिरीने पुन्हा एकदा मराठा रेजिमेंटच्या जवानांनी शौर्यगाथा रचली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इंडियन रॅपिड रिप्लायमेंट म्हणून दक्षिण आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो देशात संयुक्त राष्ट्र संघ शांती सेनेच्या माध्यमातून उरुग्वे, पाकिस्तान, बांगलादेश, युक्रेन, दक्षिण आफ्रिका, मोरोक्को, सेनेगल, मलावा, नायजेरिया, ब्राझील, पॅराग्वे, रशिया या देशांच्या सैन्याबरोबर भारतीय सेनेची एक तुकडी कार्यरत आहे. ती म्हणजे ७ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट. कांगो तील अंतर्गत बंडखोरी, शेजारील देशांकडून होणारा छळ तसेच सीमेवरील अतिक्रमण रोखण्यासाठी शांतिसेना कांगो मिलिटरी बरोबर काम करीत आहे.बंडखोरांच्या हल्ल्यावेळी प्रयत्नांची पराकाष्ठा व जीवाची बाजी लावून मराठा जवान व अधिकारी किंबहुना भारतीय सैन्याने विपरीत परिस्थितीत साता समुद्रा पलीकडे जाऊन मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
भारतीय सेना कांगोमध्ये दाखल झाली त्याचवेळी तेथील गोमा शहराजवळील अचानक आलेल्या विनाशकारी 'न्यायरागोंगो' ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या ल्हावा रसाने शेकडो घरे, झाडे जळून भस्मसात झाली. शेकडो लोकांचे बळी गेले, लाखो नागरिक बेघर झाले. या संकट काळात लाखो नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याबरोबरच त्यांना धीर देऊन अन्नपाणी पुरवण्याचे अतुलनीय काम करून मराठा मावळ्यांनी लोकांची मने जिंकली होती. या सर्व बाबींची संयुक्त राष्ट्र संघाने दखल घेतली. संयुक्त राष्ट्र सेनेचे फोर्स कमांडर यांच्या हस्ते भारतीय शांती सैनिकांना पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवले होते.
No comments:
Post a Comment