चंदगड आगार प्रमुखांची मनमानी, दोडामार्ग- बेळगांव बसप्रश्नी स्वातंत्र्यदिनी उपोषण - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2022

चंदगड आगार प्रमुखांची मनमानी, दोडामार्ग- बेळगांव बसप्रश्नी स्वातंत्र्यदिनी उपोषण



दोडामार्ग : सी. एल. वृत्तसेवा 

            गेल्या तीस वर्षापासून सुरू असलेली दोडामार्ग- बेळगाव बस चंदगड आगार प्रमुखांनी बंद केल्याच्या निषेधार्थ स्वातंत्र्यदिनी चंदगड आगारासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. आगार व्यवस्थापकांच्या मनमानीमुळे अनेक मार्गावरील बस अचानक बंद करणे, मार्ग बदलणे, वेळापत्रक बदलणे हे नित्याचे झाले आहे. या विरोधातील प्रवाशांतून नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे.

       दोडामार्ग येथून सायंकाळी सव्वा पाच वाजता सुटणारी बेळगाव घाटमाथ्यावर जाणारी शेवटची बस होती. या बससाठी गोव्यातून येणारे प्रवासी अन्य वाहनांनी दोडामार्ग येथे येऊन थांबतात. पण ही बस बंद करुन चंदगड आगारा प्रमुखांनी अन्याय केला आहे. या बसचा गोवा, दोडामार्ग, झरेबांबर, साटेली, भेडशी, आवाडा, वायंगणतड, कोनाळकट्टा, तिलारी, तेरवण, मेढे, विजघर, हेवाळे, मुळस, कोदाळी, तिलारीनगर, कळसगादे, पार्ले, हेरे, पाटणे, मोटणवाडी, पाटणे फाटा ते बेळगाव परिसरातील प्रवाशांना लाभ मिळत होता. 

            ३५ वर्षांपूर्वी तत्कालीन आगार व्यवस्थापक एच. के. पाटील (कालकुंद्री, ता. चंदगड) यांनी तिलारी घाटातून पहिल्यांदा चंदगड- दोडामार्ग बस सुरू केली. याला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नंतरच्या काळात कोल्हापूर- पणजी, कोल्हापूर- दोडामार्ग, बेळगाव- दोडामार्ग अशा अनेक एसटी तिलारी घाटातून धावू लागल्या. या सर्वच गाड्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. तथापि दोडामार्ग- बेळगाव बस अचानक बंद करणे अनारकलीनीय आहे. यामुळे मार्गावरील प्रवाशांची कुचंबणा होत आहे. 

          बंद केलेले ही बस तात्काळ सुरू न केल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी चंदगड एसटी आगारांसमोर उपोषणास बसण्याचा इशारा तेरवण- मेढे ग्रामपं. सदस्य मायकल लोबो व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

                    बेळगाव- दोडामार्ग बस सुरु  झाल्याच्या काळात तिलारी नदीवर पूल नव्हता. फक्त उन्हाळ्यात गाडी दोडामार्ग पर्यंत जायची. पावसाळ्यात नदीपर्यंत येऊन बस थांबली की सर्व प्रवासी होडीतून पलीकडे जायचे. सकाळी होडीतून येऊन बस पकडायचे. कालातरांने नदीवर पुल झाल्यानंतर एस टी  दोडामार्ग पर्यंत येऊ लागली. हळूहळू कोल्हापूर, बेळगाव आगाराच्या बस दोडामार्गावर पणजी पर्यंत धाऊ लागल्या. आता पूल, रस्ते सुधारल्यामुळे पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे बस नियमित सुरू राहणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment