कोवाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून सामानाची बांधाबांध...! 'ताम्रपर्णी' च्या पाणी पातळीत तासागणिक वाढ - चंदगड लाईव्ह न्युज

13 July 2022

कोवाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून सामानाची बांधाबांध...! 'ताम्रपर्णी' च्या पाणी पातळीत तासागणिक वाढ

दिनांक १३ जुलै २०२२ रोजी कोवाड येथील जुन्या बंधाऱ्याजवळ ची पाणी पातळी 
 (फोटो- श्रीकांत पाटील, कालकुंद्री)

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           आज दि. १३ जुलै २०२२ रोजी दिवसभर सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कोवाड, ता. चंदगड नजीक ताम्रपर्णी नदीच्या पाणी पातळीत तासागणित वाढ सुरू आहे. गेल्या तीन वर्षातील महापुराचा कटू अनुभव पाठीशी असल्यामुळे कोवाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सामानांची बांधाबांध सुरू केली आहे.

         कालपासूनच दुकानातील साहित्य अन्यत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. आज सायंकाळी ६ वाजता जुन्या बंधाऱ्यावरून पाणी जाण्यास केवळ एक फूट शिल्लक होते. जुन्या बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागताच नजीकच्या गणेश मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारील रस्त्यावरून पाणी वाहू लागते. 

          परिणामी दुंडगे, कामेवाडी वाहतूक बंद होते व दुकानातील सामानांची हलवाहलव करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे व्यापारी सतर्क झाले आहेत. संभाव्य महापूर व नुकसानी बाबत प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या सूचनेनुसार कोवाड व किणी ग्रामपंचायत कडून आपापल्या क्षेत्रातील दुकानदार व रहिवाशी यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. याची दखल घेत संभाव्य बुडीत क्षेत्रातील व्यापारी व नागरिक स्थलांतरित होण्याच्या तयारीला लागले आहेत. आत्ताचा पाऊस असाच आणखी दोन दिवस सुरू राहिल्यास बाजारपेठ ठप्प होण्याबरोबरच कोवाड- बेळगाव, कोवाड- किणी, ढोलगरवाडी,  कोवाड- माणगाव या सर्व मार्गावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकही जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यात गुंतले आहेत.

No comments:

Post a Comment