पारगड मार्गावरील उन्मळून पडलेल्या व वाकलेल्या झाडांचा वाहतुकीस अडथळा, प्रवास होतोय धोकादायक - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2022

पारगड मार्गावरील उन्मळून पडलेल्या व वाकलेल्या झाडांचा वाहतुकीस अडथळा, प्रवास होतोय धोकादायक

रस्त्याकडेला वाढलेली झाडे-झुडपे (संग्रहित छायाचित्र)

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

               मोटणवाडी ते किल्ले पारगड मार्गावर अनेक ठिकाणी वाकलेली व उन्मळून पडलेली झाडे वाहतुकीस अडथळा ठरत आहे‌त. ही झाडे शोधून बांधकाम विभागाने रस्ता वाहतुकीस निर्धोक करावा अशी मागणी पारगड पंचक्रोशीसह मार्गावरील ग्रामस्थ व पर्यटकांनी केली आहे. 

        याच मार्गावरील पारगड नजीक नामखोल ते किल्ले पारगड दरम्यान पडलेली काही झाडे एसटी वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. याबाबतचे निवेदन बांधकाम विभागाकडे पारगड ग्रामस्थांनी देऊनही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे समजते. हे अडथळे न काढल्यास एसटी वाहतूक बंद करण्याचा इशारा चंदगड आगाराने दिला आहे. सध्या पावसाचा जोर वाढला असून  हेरे गावाच्या पुढील कण्वेश्वर मंदिर पासून पारगड  किल्ल्यापर्यंत वीस किलोमीटर परिसरात पावसाळी धुक्याचे साम्राज्य असते. यामुळे वीस फुटापलीकडील काही दिसत नाही. वाहनधारकांना दिवसाही गाड्यांचे दिवे लावावे लागतात. चंदगड आगारांनेही दिवसा व रात्रीच्या वेळीही रस्ता स्पष्ट दिसेल अशा प्रकारचे दिवे असलेल्या गाड्या पारगडला पाठवाव्यात अशी मागणी प्रवासी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार, प्रकाश चिरमुरे आदींनी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment