आज दि. १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कोवाड येथील जुन्या बंधार्यावरुन पडणारे पाणी. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
आज दि. १५ जुलै २०२२ रोजी कोवाड जुना बंधारा अखेर पाण्याखाली गेला बंधाऱ्यावरून सायंकाळी सहा वाजता एक फूट पाणी वाहत होते. याबाबत कालच्या बातमीपत्रात सी एल न्यूज केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. कालच्या तुलनेत २ फुट पातळी वाढली असली तरी पावसाचा जोर ओसरल्यामुळे कोवाड बाजारपेठ व नागरिकांवरील महापुराचे संभाव्य संकट तात्पुरते टळले आहे.
दरम्यान आज सायंकाळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व उपअधीक्षक राजीव नवले यांनी स्टाफसह कोवाड येथे भेट दिली. आज दिवसभरात तिलारी पासून कोवाड पर्यंतच्या पूरस्थितीची पाहणी केली. बाजारपेठ व कोवाड पोलीस आऊट पोस्ट येथे त्यांनी नागरिकांना अतिवृष्टी व पुरा संदर्भात आवाहन व सूचना केल्या. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, जि प सदस्य कल्लाप्पा भोगण, कोवाड व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बलकवडे यांच्याकडे कोवाड साठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी करण्यात आली. याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करू असे यावेळी अधीक्षक यांनी सांगितले.
दरम्यान आज चंदगड तालुक्यातील १६ लघु पाटबंधारे प्रकल्पांपैकी कळसगादे हा पहिला प्रकल्प ओव्हर फ्लो झाला. घटप्रभा नदीवरील फाटकवाडी व ताम्रपर्णी नदीवरील झांबरे- उमगाव हे मध्यम प्रकल्प यापूर्वीच भरून वाहत आहेत.
No comments:
Post a Comment