कडलगे बुद्रुकच्या अध्यापिका सौ. अनिता पाटील २५ वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्त त्याच्या कारकिर्दीचा आढावा.......... - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2022

कडलगे बुद्रुकच्या अध्यापिका सौ. अनिता पाटील २५ वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्त त्याच्या कारकिर्दीचा आढावा..........

               मराठी विद्या मंदिर कडलगे बुद्रुक, ता. चंदगड येथील अध्यापिका सौ अनिता रामचंद्र पाटील (M.A.,TCH) या आपल्या २५ वर्षांच्या सेवेतून दि. ३१ जुलै २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा माहितीपर अल्प परिचय...................

                सौ. अनिता रामचंद्र पाटील मु. पो. कडलगे बुद्रुक, (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) लग्ना पूर्वीचे नाव कु. मल्लवा रुक्माना पाटील, रा. कंग्राळी खुर्द, तालुका जिल्हा बेळगाव. जन्म दिनांक २० जुलै १९६४. प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते सातवी आदर्श सरकारी मराठी शाळा कंग्राळी खुर्द, माध्यमिक शिक्षण ८ वी ते १० वी मार्कंडेय हायस्कूल मार्केट यार्ड बेळगाव. 

सौ अनिता पाटील पती निवृत्त केंद्र प्रमुख श्री रामचंद्र जयराम पाटील यांच्या समवेत

उच्च माध्यमिक शिक्षण ज्योती जुनियर कॉलेज बेळगाव. TCH मराठी ट्रेनिंग कॉलेज माधवपूर वडगाव बेळगाव. B. A. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. M.A. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. माध्यमिक शाळेत असताना खो-खो कबड्डी खेळात प्राविण्य मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. TCH. मराठी टीचर ट्रेनिंग कॉलेज मध्ये शिकत असताना १००, २००, ४०० मीटर धावणे, रिले, कबड्डी, खोखो खेळात प्रथम क्रमांक व सुवर्णपदक प्राप्त केले. उच्च माध्यमिक ११ वी १२ वी असताना नवोदित कवयित्री म्हणून स्वामीकार रणजित देसाई व लेखिका माधवी देसाई यांच्या हस्ते कवी संमेलनात सन्मान.

             प्राथमिक शिक्षिका म्हणून २६ ऑगस्ट १९९७ रोजी  उपळे नं. २, कार्शिग, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे रुजू. पहिली ते चौथीपर्यंत असलेली ही शाळा सातवी पर्यंत करण्यासाठी प्रयत्न करुन त्यात यशस्वी ठरल्या. या शाळेत अतिरिक्त झाल्यानंतर याच तालुक्यात धुमाळवाडी शाळेत प्रशासकीय बदली झाली. येथील दहा वर्षांच्या काळात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, प्रौढ शिक्षण वर्ग चालवणे, वृक्षारोपण अशी अनेक उल्लेखनीय कामे केली.

             दिनांक ४ मे २००७ रोजी पती-पत्नी सोय या नियमाने केंद्रीय प्राथमिक शाळा माणगाव, ता चंदगड, जि कोल्हापूर शाळेत बदलीने हजर झाल्या. माणगाव येथे असताना सर्विस बुक आणण्यासाठी राजापूरला जावे लागले. परत येताना २० जुलै २००९ रोजी आंबोली घाटातील नांगरतास धबधब्याजवळ मोटरसायकलला भिषण अपघात होऊन जबर जखमी झाल्या. मेंदूतील रक्तस्त्राव मुळे कोमात गेल्या. जखमी अवस्थेत बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी मामा शंकरराव गंगाराम पाटील (अडत व्यापारी बेळगाव), काका बेळगावचे माजी आमदार कै बी आय पाटील तसेच दिर, भावजय, भाऊ, बहिणी, नातेवाईक, हॉस्पिटल मधील डॉक्टर यांनी अथक परिश्रम घेऊन प्राण वाचवले. हा एक प्रकारे पुनर्जन्मच होता. 

            २००९ मध्ये मराठी विद्या मंदिर कडलगे बुद्रुक या सासरच्या गावी बदली झाली. तेव्हापासून उदात्त हेतूने शैक्षणिक सेवा करून विद्यार्थी घडवले. नियत वयोमानाप्रमाणे त्या दि. ३१ जुलै २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. 

           सौ. अनिता यांचे लग्न कडलगे येथील प्राथमिक शिक्षक असलेले रामचंद्र जयराम पाटील (सेवानिवृत्त केंद्रप्रमुख) यांच्याशी १६ मे १९८७ रोजी झाले. हे लग्न अनिता यांच्या कालकुंद्री, ता. चंदगड येथील बहिणीचे पती निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी कै वसंत कल्लोजी पाटील, सासरे जयराम रामा पाटील, ईश्वर धोंडीबा पाटील गुरुजी कडलगे व दत्तू इक्के यांनी जमवले होते. सौ अनिता आणि रामचंद्र या दांपत्याला दोन मुले आहेत. विनायक रामचंद्र पाटील (M Sc, B Ed ) हा सध्या मांगेली-  तळेवाडी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग येथे अध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर मुलगी वर्षा रामचंद्र पाटील, D फार्मसी असून BHMS चा अभ्यास करत आहे. नुकताच तिचा कोवाड, चंदगड येथील अमोल धोंडीबा कुट्रे (मेकॅनिकल इंजिनिअर) यांच्याशी  विवाह झाला आहे.

               जीवनात अनेक चढउतार पाहिले, जीवावर बेतलेल्या कटू प्रसंगाना तोंड दिले. पण शाळेतील विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर याचा विपरीत परिणाम होऊ न देता लहान बालकांना घडवले. याचे मनस्वी समाधान आहे. तसेच पाटील कुटुंबात आपण आनंदी व समाधानी आहोत. असे त्या कृतार्थपणे सांगतात.

              सेवानिवृत्ती निमित्त सौ अनिता रामचंद्र पाटील यांना चंदगड  तालुक्यातील सर्व शिक्षक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राच्या वतीने हार्दिक शुभेच्छा! त्यांना याप्रसंगी दीर्घायुरारोग्य लाभो ही सदिच्छा...!

No comments:

Post a Comment