किल्ले पारगड वरील भवानी मंदिर समोरची दरड कोसळली, ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी तातडीच्या उपाय योजनेची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2022

किल्ले पारगड वरील भवानी मंदिर समोरची दरड कोसळली, ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी तातडीच्या उपाय योजनेची गरज

  किल्ले पारगड वरील भवानी मंदिराच्या पूर्वकडील सभामंडपाचा कोसळलेला भाग व रेलिंग

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगड वरील भगवती भवानी मंदिर समोरील सभा मंडप नजीकची दरड काल दि. १७ रोजी अतिवृष्टीमुळे कोसळली. येथे तात्काळ उपाय योजना न केल्यास संपूर्ण सभामंडप व  भव्य ऐतिहासिक मंदिरास धोका निर्माण होऊ शकतो.

           किल्ल्यावरील भवानी मंदिराच्या पूर्वेस काही अंतरावर दोनशे फूट खोल नैसर्गिक कडा आहे. याच्या वरील भागात वसलेल्या मंदिराच्या समोरील सभा मंडपात  पेविंग ब्लॉक बसवले आहेत. दोन वर्षांपूर्वी येथील काही भाग अतिवृष्टीत कोसळला होता. यात बांधकाम विभागाने किल्ल्याची ऐतिहासिक माहिती देणारा भव्य ग्रॅनाईट फरशीतील मजकूर फुटून नामशेष झाला होता. मागील महिन्यात ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त तालुक्याचे आमदार राजेश पाटील किल्ल्यावरील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दोन दिवस किल्ल्यावर मुक्कामी होते. यावेळी ग्रामस्थ व पारगड जनकल्याण समिती पदाधिकाऱ्यांनी वरील धोकादायक ठिकाणी धक्का बांधण्याबाबत विनंती केली होती. आमदार पाटील यांनी पावसाळा संपताच येथे धक्का बांधण्याचे आश्वासनही दिले आहे. तथापि तत्पूर्वीच ही दरड कोसळल्याने सभा मंडप व मंदिरास धोका निर्माण झाला आहे.

     सद्यःस्थितीत पारगड  किल्ल्यावर जाणाऱ्या घोडेवाट वळणावर अतिवृष्टीमुळे खड्डे पडले आहेत. हा रस्त्याचा हा भाग यंदा उन्हाळ्यात रुंदीकरण व डांबरीकरण करणे अपेक्षित असताना त्या ऐवजी ठेकेदाराने किल्ल्यास वळसा घालणारा रस्ता  केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. घोडेवाट वळणावरील रस्ता म्हणजे ग्रामस्थ व पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणची तात्काळ दुरुस्ती करून मंदिरापर्यंत वाहने कशी जातील हे पाहिले पाहिजे. तरच मंदिराकडील खचलेल्या भागाची दुरुस्ती करण्यासाठी वाहने गडावर जातील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

         एकंदरीत मंदिराचे अधिक नुकसान होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ हालचाली करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment