आसगाव ते चुरणीचावडा दरम्यान एक महिन्यापूर्वीच बांधलेल्या मोरीची अतिवृष्टीने उडालेली दैना. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
आसगाव ते चुरणीचावडा दरम्यानच्या रस्त्यावर एक महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली मोरी पहिल्याच पावसात वाहून गेली. यामुळे परिसरातील सुमारे ३० शेतकऱ्यांच्या भात शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील नागरिक व वाहनधारकांची मागणी असलेली ओढ्यावरील ही मोरी एक महिन्यापूर्वीच बांधून पूर्ण झाली होती. या मोरीचे बांधकाम सुरू होताना सामाजिक कार्यकर्ते भारत गावडे तसेच दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी मोरीचे बांधकाम चुकीच्या ठिकाणी होत असल्याचे सांगून जागा बदलण्याचा आग्रह धरला होता. तथापि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी "इंजिनीयर मी का तुम्ही? तुमच्यापेक्षा मला जास्त कळते." असा प्रतिसवाल करत सर्वांना गप्प केले होते. असा आरोप होत आहे.
अतिवृष्टीने मोरी वाहून जातात काल दि १७ रोजी नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ ठेकेदाराला भेटले असता ठेकेदार म्हणतो, "नुकसान भरपाई देण्याशी माझा काय संबंध नाही. प्लॅन पीडब्ल्युडीच्या इंजिनीअरने दिला होता. माझे काम फक्त बांधणे एवढेच आहे. तुम्ही त्याला जाऊन विचारा".
सद्यस्थितीत अतिवृष्टीने मोठा पाण्याचा प्रवाह मोरीवरून गेल्यामुळे बांधलेल्या मोरीच्या दोन्ही बाजूचा भराव वाहून खालील शिवारात पसरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या चुकीच्या ठिकाणी बांधलेल्या मोरीमुळे बांधकाम उघडे पडल्यामुळे यावरून पायी चालत पलीकडे जाणेही मुश्किल झाले आहे. या मोरीच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भारत गावडे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment