बेळगावच्या एक्स्ट्रीम ग्रुपकडुन सुळये येथील आपदग्रस्त माने कुटुंबाला मदत - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2022

बेळगावच्या एक्स्ट्रीम ग्रुपकडुन सुळये येथील आपदग्रस्त माने कुटुंबाला मदत

सुळये (ता.चंदगड) येथील माने कुटुंबीयांना मदत सुपूर्द करताना कृष्णा पाटील. शेजारी नंदकुमार ढेरे, संपत पाटील, चेतन शेरेगार, शंकर धुरी आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           बेळगाव येथील एक्स्ट्रीम ग्रुपचे एमडी इंद्रजीत प्रधान, सीईओ संदीप अष्टेकर, सीएओ मनीषा अनगोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुळये (ता. चंदगड) येथील निराधार माने कुटुंबाला मदत करण्यात आली. 

        एक्स्ट्रीम सिक्युरिटीच्या शिनोळी (ता. चंदगड) येथील युनिटचे मॅनेजर कृष्णा पाटील यांच्या हस्ते या कुटुंबाला आर्थिक मदत व जीवनाशक वस्तू देण्यात आल्या. सुळये येथील नागोजी माने या कुटुंबप्रमुखाचे काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात म्हातारी आई, पत्नी व तीन लहान मुले असून बिनभिंतीच्या झोपडीत दिवस कंठत होती. कुटुंबीयांच्या दर्दनाक स्थितीचे व्हीडीओ वृत्त चंदगड तालुक्याचे मुखपत्र चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित चंदगड लाईव्ह तथा सी. एल. न्युजने व्हिडिओसह बातमी प्रसारित करुन या कुटुंबाला सर्वप्रथम रोख रुपये ५ हजार मदत देऊन आधार दिला होता. त्यानंतर काही व्यक्ती व संघटनांनी मदतीचा हात पुढे केला. 

           यावेळी कृष्णा पाटील म्हणाले, ``एक्स्ट्रीम ग्रुपचे एक्स्ट्रीम फाउंडेशन कार्यरत आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून  बेळगाव, चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील गरजू कुटुंबीयांना आम्ही मदत करत आहोत. या उपक्रमांतर्गतच घर कोसळलेल्या आणि निराधार झालेल्या माने कुटुंबांनाही आम्ही मदत करत आहोत. यावेळी भारतीय सैन्य दलाचे हवालदार शंकर धुरी, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, संपादक संपत पाटील, सचिव चेतन शेरेगार, सुरक्षा रक्षक शंकर पटेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment