वेडा मुसाफिर ... अंतर्धान पावला - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2022

वेडा मुसाफिर ... अंतर्धान पावला

प्रा. पी सी पाटील यांना सी एल न्यूज ची श्रद्धांजली

प्रा. पी सी पाटील


पी. सी. पाटील तथा पांडुरंग चुडामणी पाटील. स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्म. वय वर्षे ८०.  शिक्षणासाठी तत्कालिन दुर्गम असलेल्या चंदगड तालुक्यातील छोट्याशा होसूर गावचा हा सुपुत्र. पळसाच्या ओल्या पानांच्या पत्रावळ्या, करवंद, दिडगे, नाचणा असं  डोकीवर ओझं घेऊन वडिलांसोबत बेळगावला पंचवीस किलोमीटरचं अंतर चालत जायचा. घरच्या गरिबीच्या रहाटगाडग्याचा गाडा ओढणारी ही चिमुकली पावलं शैक्षणिक भुकेची मोट ओढत कोल्हापौर येथे स्थिरावली आणि शनिवार दि. २३/७/२०२२ रोजी उजळाईवाडीतील हिरवळीत अंतर्धान पावली. या वेड्या मुसाफिराचा प्रवास येथे थांबला.
विजयसह आम्हा चार पांडुरंगाची साहित्य चळवळीत गोफण होती. आदरणीय कै पांडु कुंभार गुरुजी नेहमी म्हणायचे, " पांडु.... पिस्सा... कोठे आला नाही. खरंच पी. सी. हा पिस्सा होता. वेडा होता. साहित्य जागरातील पेटती मशाल घेऊन नाचणारा गोंधळी होता. चंदगडच्या वाडीवस्तीत उच्च शिक्षणाची बीजं पेरणारा, स्वप्नं पेरणारा शेतकरी होता. शहरी विद्वांनांची मांदियाळी शाळा- महाविद्यालयात पोहचवणारा वेडा मुसाफिर होता. तालुक्यातील अवघ्या शैक्षणिक विश्वात पहिलं मार्गदर्शन, पहिला पाहुणा ठरविण्याचा मान सरांचा होता. तशी ती तालुक्याची गरज होती.
निरोप पोचताच वेळेवर चारचाकी घेऊन सर नीटनिटके, थाटामाटात यायचे. पंचाहत्तरीतही केस काळे करुन, चोपदार पाडलेला भांग आणि कोट घालूनच सर यायचे.  विद्वतेचं प्रतिक दाखवणारा डौलदार चष्मा, संदर बॅग आणि हसतमुख चेहरा ही सरांची ओळख होती. मध्यम बांध्याचे, हसते-खेळते खुमासदार सदाबहार सर विचारमंचावर स्थानापन्न झाले टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. त्यानंतर सर माईकवर ताबा घ्यायचे आणि व्यासपीठावर लिलया वावर करत पाहुण्यांची ओळख बहारदारपणे पार पडायची. *आज पाहुण्यांची ओळख पोरकी झाली.*
खेडुत शिक्षण मंडळ कालकुंद्री, सर्वोदय,शिक्षण संस्था कोवाड, पद्मश्री रणजीत देसाई सार्व. ग्रंथालय कोवाड, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य अशा संस्थांत सरांचं योगदान मोलाचं आहे. कोल्हापुरातील विविध मंडळे, संघटनांशी त्यांचे जवळचे संबंध होते. पदरमोड करत घराकडे दुर्लक्ष करत सरांची समाजाप्रती असलेली बांधिलकी अनेक प्रसंगात तालुक्याने आणि जिल्ह्यानेही अनुभवली आहे. त्यांच्या या कार्याच्या स्मृती जपल्या गेल्या पाहिजेत.
माणुसकी हा धर्म जपला, मैत्रीसाठी जीव लावला, अगणित नाती जोडली आणि जोपासलीही. सराचं फिरणं खूप व्हायचं. मित्रांच्या घरी जाणं व्हायचं. पण कधी कुणाच्या घरी सर रित्या हातानं गेले नाहीत. कुणाकडे जेवले की घरच्या लक्ष्मीचं, सुगरणीचं मुक्तकंठाने कौतुक करायचं तर ते पी. सी. सरानीच.
सरांनी अंधश्रद्धेच्या विरोधात एक काळ गाजवला होता. महाराष्ट्र, बेळगाव सीमाभाग आणि गोव्यात त्यानी ३५० हून अधिक कृतीशील व्याख्याने दिली. स्वखर्चानं येणारा हा पाहुणा प्रसंगी बडबड गीतं, बालगीतं, तरुणांमध्ये इंग्रजीची चिरफाड करणारा वक्ता, दुर्मिळ, प्रेरणादायी किस्से सांगत सर अवघा माहोल मतीगुंग करायचे. हे सगळं करत असताना सरांना लाखाचा पगारही कधी पुरला नाही.
काकु स्नेहलता नेहमी तक्रारसुरात बोलायच्या. चंदगड म्हटलं की त्या अबोल व्हायच्या कारण चंदगड भुमी ही सरांची पहिली सौभागयवती, दुसरी अर्धांगिनी शैक्षणिक विश्व आणि तिसरी पत्नी स्नेहलता.
आयुष्यातील त्यांचं आतापर्यंतचं संचित बघितलं तर उजळाईवाडीतील "हिरवळ" बंगला. बाकी शुन्य.
पण दुसरीकडे मोजता न येणारी माणुसकीची संपत्ती. जिवाला जीव देणारा जीभेनं जोडलेला गोतावळा. आणि कोल्हापुरातील त्यांची स्वमालकीची प्रचंड ग्रंथसंपदा आणि मागे राहिलेल्या सत्कार्याच्या स्मृती.  खरंच हे विश्व दुर्मिळ आहे.
सर स्वच्छंदी जगले. कधी ईच्छा मारुन जगले नाहीत. ग्रंथपाल म्हणून पुस्तकांच्या सुगंधात जगले. हा स्वच्छंदी, पापभिरु अवलिया म्हणूनच स्मरणात राहील.
नाट्य आणि सिने कलावंत धनंजय आणि विकास ही त्यांची दोन मुलं व एक कन्या हा त्यांचा परिवार.
शालेय जीवनात पाठ झालेल्या कविता आणि गाणी ते गुणगुणत असायचे. त्यांच्या आवडीचं " ऊठ पंढरीच्या राजा... फार वेळ झाला.. थवा वैष्णवांचा दारी पहाटेच आला.

सर .....पांडुरंगा पाहताय ना.. ..तुमच्या वैष्णवांचा थवा तुम्हाला निरोप देण्यासाठी सागरासारखा जमलाय.

*पांडुरंग जाधव*
*कोवाड*

No comments:

Post a Comment