घरावर तिरंगा झेंडा लावताना चंदगड तालुक्यात शेतकरी घरावरून पडून गंभीर जखमी, बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2022

घरावर तिरंगा झेंडा लावताना चंदगड तालुक्यात शेतकरी घरावरून पडून गंभीर जखमी, बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

शिवाजी भैरु नाईक

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
   घर घर तिरंगा अभियान अंतर्गत घरावर तिरंगा ध्वज फडकवताना कौलांवरून पाय घसरून पडल्यामुळे शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना दिंडलकोप (ता. चंदगड) येथे घडली. घटनेची नोंद पोलिसात झाली असून जखमीवर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयातील अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
    याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, दिंडलकोप (ता. चंदगड) येथील शिवाजी भैरु नाईक हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घर घर तिरंगा अभियान अंतर्गत दि. १३ रोजी सकाळी सव्वा सात वाजता झेंडा लावण्यासाठी आपल्या घरावर चढले होते. झेंडा बांधत असताना सततच्या पावसामुळे कौलांवर शेवाळ आल्यामुळे त्यांचे दोन्ही पाय घसरून ते वीस फुटावरून खाली जमिनीवर पडले. यात त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला असून दोन्ही पाय व मेंदूला जबर दुखापत झाली आहे. तातडीने कोवाड येथील खाजगी रुग्णालयात नेले. ते कोमात जाण्याची शक्यता दिसताच अधिक उपचारासाठी बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू असून ते कोमामध्ये गेले आहेत. विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या केल्या असता त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असून ही घटनेची माहिती राज्य शासनापर्यंत पोहोचल्याचे समजते. दरम्यान कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी संबंधित रुग्णालयाच्या मुख्य डॉक्टरांना दूरध्वनी द्वारे संपर्क करून उपचारात कसूर होऊ नये. अशा प्रकारच्या सूचना दिल्याची तसेच कोवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्याची माहिती राजगोळी बुद्रुकचे पोलीस पाटील काशिनाथ कांबळे यांनी सांगितली.
   मोलमजुरी करून चरित्रार्थ चालवणारा गरीब शेतकरी शिवाजी नाईक यांच्यावर पर्यायाने त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल दिंडलकोप व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


No comments:

Post a Comment