महागाव येथे १,८८,६०० रूपयांच्या बनावट नोटासह तिघांना अटक, गडहिंग्लज पोलिसांची मोठी कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2022

महागाव येथे १,८८,६०० रूपयांच्या बनावट नोटासह तिघांना अटक, गडहिंग्लज पोलिसांची मोठी कारवाई

बनावट नोटाप्रकरणी अटक केलेल्या संशयीत आरोपीसमवेत पो. नि. रविंद्र शेळके, उपनिरिक्षक विक्रम वडणे, बाजीराव कांबळे

तेऊरवाडी / एस. के. पाटील

       महागाव (ता. गडहिंग्लज) गावच्या हद्दीत पाच रस्ता चौक येथे पोलिसानी कारवाई करून बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना बनावट नोटांसह ताब्यात घेतल्याने गडहिंग्लज विभागात खळबळ उडाली आहे.

महागावातील पाच रस्ता चौकात दोन इसम बनावट नोटा खपविण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी यावर तत्काळ सापळा रचून १, ८८, ६०० / रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून महागाव, नेसरी व चिकोडीतील तिघांच्यावर कारवाई करून ताब्यात घेतले आहे.

      पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की महागाव (ता. गडहिंग्लज) येथे बनावट नोटा खपविण्याच्या उद्देशाने आज (शनिवार) रात्री एकच्या सुमारास दोन इसम येणार असल्याची माहिती गडहिंग्लज पोलिसांना मिळाली. गडहिंग्लज पोलिसांनी तत्काळ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बिगर ड्रेसमध्ये दोन पथके करून महागाव पाच रस्ता चौकात सापळा रचला. काही वेळाने ड्रेसमध्ये दोन पथके करून महागाव पाच रस्ता चौकात सापळा रचला. काही वेळाने पाच रस्ता चौकात रस्त्याच्या बाजूला दोन इसम थांबलेले आढळून आले. तर एक इसम त्यांच्याकडे जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. संशय आलेने पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांनी पथकाला अलर्ट केले आणि तिघा संशयित आरोपीवर छाप टाकून रंगेहात पकडले. यामध्ये अब्दुलरजाक आब्बासाहेब मकानदार (वय २५, रा. चिकोडी, ता. चिकोडी) याच्याकडून ६५,५०० / - अनिकेत शंकर हुले (वय - २० , रा - महागाव, ता. गडहिंग्लज) याच्याकडून ६७,००० / - व संजय आनंदा वडर (वय - ३५, रा. नेसरी शिक्षक कॉलनी, ता. गडहिंग्लज) यांच्याकडून ५६,१०० / रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या तर एक दुचाकी गाडी ताब्यात घेतली आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, उपनिरीक्षक विक्रम वडणे, हेडकॉन्स्टेबल बाजीराव कांबळे, राजकुमार पाटील, नामदेव कोळी, दादू खोत, दीपक किल्लेदार, गणेश मोरे यांच्या पथकाने केली.




No comments:

Post a Comment