चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात तालुका विधीसेवा शिबिरामध्ये बोलताना न्यायाधीश ए. सी. बिराजदार, व्यासपीठावर सह दिवाणी न्यायाधीश चारुदत्त शिपकुले, ॲड. रवी रेडेकर, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील आदी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
'मानवी जीवनात पावलोपावली कायद्याची गरज भासते. समाजातील दुर्बल घटक व अन्यायग्रस्त घटक, वंचितांना न्याय देण्यासाठीच मोफत विधी सहायता योजना अंमलात आली. विद्यार्थ्यांनी सदैव दक्ष व चाणाक्ष राहिले पाहिजे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपले दायित्व पार पाडले पाहिजे. समाज माध्यमांचा विधायक वापर करण्यासाठी व्यापक समाज प्रबोधन केले पाहिजे, असे प्रतिपादन चंदगड न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) अमृत बिराजदार यांनी केले. यावेळी त्यांनी विधी सेवा प्राधिकरणाची कार्यपद्धती समजावून दिली.
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित शिबिरात मार्गदर्शन करीत होते. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश चारुदत्त शिपकुले यांनी वैकल्पिक वाद निवारण ही काळाची गरज असल्याचे मत प्रतिपादन केले. सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेण्याची मानसिकता निर्माण करण्याची गरज विशद केली. यावेळी ॲड. रवी रेडेकर यांनी रॅगिंग बाबत प्रबोधन केले.
ॲड. हेमलता मादार यांनी शिक्षण हक्काविषयी तर ॲड. विजया आजरेकर यांनी महिला विषयक कायद्याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. डी. गोरल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. प्रा. एस. एन. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोहन वैराट, अजय घाटगे, ॲड. एन. एन. गावडे यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment