चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आज शारिरीक स्वास्थ्यासोबतच सामाजिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्यही जपणे तितकेच महत्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न म्हणजे मानसिक ताण. त्यातून तरुण वयात अनेकजण आत्महत्या करत आहेत. मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने कमी वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे आपण शारिरीक स्वास्थ्यासोबतच मानसिक, सामाजिक स्वास्थ्य देखिल जपले पाहीजे असे मत चंदगड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी व्यक्त केले. स्त्रियांना भेडसावणारे कॅन्सरसारखे आजार यासाठी जनजागृती होणे गरजेचे असून आशा सेविकांमार्फत शासकीय पातळीवर आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यामध्ये जनजागृती करण्याचे नियोजन असल्याचे डॉ. सोमजाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
युवा संवाद न्यूज मीडियाच्या 'शाश्वत स्वास्थ्य' या आरोग्यविषयक मासिकाचे काल (शनिवार दि. २७ ऑगस्ट रोजी) प्रकाशन चंदगड तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. अरविंद पठाणे, यशोदा मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉ. एन.टी. मुरकुटे यांच्या हस्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष मळविकर, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, जे.जी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या मासिकाच्या माध्यमातून आरोग्य विषयक संपूर्ण माहिती, शासकीय योजनाची जनजागृती आणि आरोग्याच्या अत्यावश्यक सुविधा लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी प्रास्ताविकातून संपादक महेश बसापूरे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. पठाणे यांनी आपल्या प्रदिर्घ अनुभवावरून चंदगड तालुक्यातील आरोग्याच्या खऱ्या समस्या काय आहेत यावर प्रकाश टाकला. त्यातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे तालुक्यातील आहार सेवनाची सवय आणि त्यात आपण समतोल आहार घेत नाही. तसेच तालुक्यातील विशेषतः महिलांकडून आजारांकडे केले जाणारे दुर्लक्ष, स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा या सर्व गोष्टी आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या ऊद्भवण्यासाठी कारणीभूत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे भविष्यात शाश्वत स्वास्थच्या माध्यमातून तालुक्यातील आरोग्याच्या समास्या लोकांसमोर येतील. त्यातून योग्य आरोग्यविषयक माहिती, शासकीय योजना आणि जनजागृती केली जाईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. एन. टी. मुरकुटे यांनी तालुक्यातील महिलांमध्ये आरोग्यविषयक अनेक तक्रारी असून त्याकडे दूर्लक्ष करण्याची सवय हे कारणीभूत असल्याचे स्पष्ट करत त्याबाबत जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
ॲड. मळविकर यांनी चंदगड तालुक्याच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त करत तालुक्याचे वातावरण फ्रेश, चांगले आहे असे सर्वत्र बोलले जाते. तर मग तालुक्यत आजारांचे आणि रोगांचे प्रमाण वारंवार का वाढत आहे? गावागावात आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यावर सखोल विवेचन करून कारणे शोधण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी पत्रकारीता करतांना सामाजिक भान ठेवून समाजातील लोकांचे आरोग्य तसेच स्वास्थ्याबद्दल निघत असलेल्या मासिकाचे कौतुक करत या मासिकाला वाचकांचीही साथ मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. विलास नाईक व जे. जी. पाटील यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून शाश्वत स्वास्थ्य मासिकाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करतांना डॉ. प्रकाश बांदिवडेकर यांनी आर्थिक सुबत्ता, पैसा यापेक्षाही चांगले आरोग्य हाच खरा दागिना असल्याचे सांगत सुखी जीवनाचे निरोगी आरोग्य हेच मोठे लक्षण आहे. त्यासाठी आरोग्यविषयक योग्य सवयी आणि माहिती, मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.
यावेळी विलास नाईक, शिवाजी पाटील, वरिष्ट पत्रकार अनिल धुपदाळे, संतोष सावंत-भोसले, संतोष सुतार, संजय कुट्रे, निंगापा बोकडे, विलास कागणकर, तातोबा गावडा, शानुर मुल्ला, नंदकिशोर गावडे, सागर चौगुले, कौशल बांदिवडेकर, दिगंबर कांबळे, अलेक्स फर्नांडीस, दशरथ कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
सुत्रसंचालन माधुरी कांबळे यांनी केले तर शाश्वत स्वास्थ्यला शुभेच्छा देत सर्व मान्यवरांचे आभार डॉ. प्रकाश बांदिवडेकर यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment