तुडये येथून चोरी झालेल्या दोन म्हैशीसह आरोपी २४ तासात ताब्यात, चंदगड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2022

तुडये येथून चोरी झालेल्या दोन म्हैशीसह आरोपी २४ तासात ताब्यात, चंदगड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           तुडये (ता. चंदगड) येथील  गणपती पाटील यांच्या शेतातील गोट्यातून  दोन मुरा जातीच्या म्हशींची चोरी करून बेळगाव येथील जनावरांच्या बाजारात विक्री करताना काल सोमवार दि. ८ रोजी चंदगड पोलिसानी परशराम ईश्वर पाटील (रा. तुडये) येथील आरोपीला रंगेहाथ पकडले. म्हैशी चोरीची फिर्याद दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासात चोरीचा छडा लावण्यात चंदगड पोलिसांना यश आले.

         रतन पाटील यांनी शनिवारी दिवसभर म्हैशी चारून झाल्यानंतर सायंकाळी गट नंबर ५८४ मधील गोट्यात बांधून दूध काढून म्हैशींना वैरण घालून गोट्याला कुलूप लावून घरी परतले. पाटील हे रविवारी पहाटे दूध काढण्यासाठी गोठ्याकडे गेले असता गोठ्याचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. परंतु कुलूप न तुटल्याने कडीकोयंडा उचकटून गोठ्यात बांधण्यात आलेल्या दोन मुरा जातीच्या म्हैशींची दावण तोडून चोरट्यांनी म्हैशींची चोरी केली. 

              आजूबाजूला तसेच परिसरातील गावातून शोधाशोध केली असता म्हैशींचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. यामध्ये सुमारे ७५ हजाराचे नुकसान शेतकऱ्याचे झाले. दरम्यान फिर्याद दाखल झाल्यानंतर कॉन्स्टेबल राजू जाधव यानी बारकाईने तपास करत चोराचा मागोवा घेत बेळगाव येथील जनावरांच्या बाजारपेठेत म्हैशींची विक्री करत असतानाच तुडये येथीलच परशराम ईश्वर पाटील याला रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राजू जाधव यानी एकट्यानेच तपास करून २४तासात चोराला पकडले. या कार्याबद्दल कॉन्स्टेबल जाधव यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment