चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकी पत्करलेल्या 'रवळनाथ' ने सहकारी क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला आहे. त्यामुळे 'रवळनाथ'च्या देशभरातील विस्तारात गडहिंग्लज विभागातील सर्वांनी सक्रिय हातभार लावावा. याकामी प्रशासन विभागाचेही सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही गडहिंग्लज उपविभागाचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली. श्री रवळनाथ को - ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आयोजित पंच्याहत्तरी पूर्ण केलेले सभासद, सेवानिवृत्त सभासद आणि सभासदांच्या यशवंत पाल्यांचा गौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.
तहसिलदार विनोद रणानवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. वाघमोडे म्हणाले, 'रवळनाथ' परिवारातील मंडळींनी खेड्यातील मुलांसाठी गडहिंग्लजमध्ये सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिकेसह सुरू केलेली' झेप अॅकॅडमी' देखील मोठ्या शहरातील व्यावसायिक ॲकॅडमींना लाजवणारी आहे. त्यातूनही आदर्श व उच्च दर्जाचे अधिकारी नक्कीच निर्माण होतील. तहसिलदार श्री. रणावरे म्हणाले, 'रवळनाथ' ने बँकींग व्यवसायाबरोबरच जोपासलेली शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. श्री. चौगुले म्हणाले, सभासद, ठेवीदार, कर्जदार व ग्राहकांचा विश्वास आणि संचालक व कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळेच संस्थेची चौफेर प्रगती झाली आहे. यावेळी सभासद यशवंत पाल्य कु. गायत्री गावडे, आदिती घोरपडे, अक्षय कोकीतकर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, सभासद नारायण सुतार, वयाची पंच्याहत्तरी पुर्ण झालेले सभासद वसंत पेडणेकर, रोहिणी देशपांडे यांचा सत्कार झाला. याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, राजेश घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव, चंदगड शाखा सल्लागार नारायण काणेकर, माजी सल्लागार चंद्रकांत दुगानी, सभासद जयवंत कोकीतकर, सौ. सविता चौगुले, कु. संपदा चौगुले, शाखाधिकारी दीपक शिंदे आदींसह सभासद, कर्मचारी उपस्थित होते. चंदगड शाखा चेअरमन सौ. पुष्पा नेसरीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चंदगड शाखा सल्लागार प्रा. डॉ. राजाराम साळुंखे यांनी सुत्रसंचलन केले. संचालिका सौ. रेखा पोतदार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment