दोडामार्ग-कोल्हापूर बसला हुनगीनहाळ नजिक अपघात, दोन प्रवासी जखमी, चालकाच्या प्रसंगावधानामुळे इतर प्रवासी सुखरूप - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2022

दोडामार्ग-कोल्हापूर बसला हुनगीनहाळ नजिक अपघात, दोन प्रवासी जखमी, चालकाच्या प्रसंगावधानामुळे इतर प्रवासी सुखरूप

दोडामार्ग-कोल्हापूर गाडीला गडहिंग्लज हुनगीनहाळ जवळ अपघात

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर हुनगीनहाळ गावाजवळील ओढ्यानजीक रस्त्याकडेला पडलेल्या  झाडाला चुकविताना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर आगारातील दोडामार्ग-कोल्हापूर (बस क्रमांक एमएच -१४,बीटी,०५०९) या बसला अपघात झाला. बस झाडावर आदळल्याने दोन प्रवासी जखमी झाले. आज (शनिवारी दि. ०६ ऑगस्ट रोजी) सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. चालक रणवीर काशिनाथ जुगदार (रा. कोल्हापूर) यांच्या प्रसंगावधानाने ३७ प्रवाशांचे प्राण वाचले.

        गडहिंग्लज - चंदगड मार्गावर हुनगिनहाळ गावाजवळ पावसाने रस्त्यावर झाड उन्मळून पडण्याचा धोका निर्माण झाला होता. याची कल्पना येताच बस चालकाने प्रसंगावधान राखत एस. टी. बाजूला घेतली. मात्र, झाड चुकविताना बसच्या समोरील बाजूला झाडाच्या फांद्या घुसल्या, पण चालकाने प्रसंगावधान राखत गाडीचा वेग कमी केल्याने बस मधील इतर प्रवाशांना कोणतीही इजा पोहचली नाही.मात्र बसच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाने दाखवलेल्‍या प्रसंगावधानामुळे प्रवाशांतून त्‍याचे कौतुक होत आहे.

         या अपघातात स्नेहल शशिकांत पाटील (वय- ५७, रा. कोळीन्द्रे, ता. चंदगड) व माधुरी मारुती केसरकर (वय-३५, रा. नेसरी) या दो महिला प्रवासी जखमी झाल्या. बसमधील अन्य प्रवासी सुखरूप आहेत. या अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment