ग्रामपंचायत चिंचणे येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2022

ग्रामपंचायत चिंचणे येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान

ग्रामपंचायत चिंचणे येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

         भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये चंदगड तालुक्यातील चिंचणे  (ता. चंदगड) गावचा सहभाग फार महत्त्वाचा राहिला आहे. जेमतेम ५०० लोकवस्तीच्या अतिशय छोट्याशा गावातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत १० स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान लक्षात घेण्यासारखे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत चिंचणे यांच्या वतीने स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा गावाच्या वतीने सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने १५ ऑगस्ट पूर्वी  सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना निमंत्रण पत्र दिले. ध्वजारोहण स्वातंत्र्य सेनानी याची वीर पत्नी गौरवा रामचंद्र गुरव यांच्या हस्ते मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.

          १५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य सेनानी/ सैनिकांच्या प्रतिमांचे सजविलेल्या बैलगाडीतून  ढोल ताशांच्या गजरात गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ, विविध तरुण मंडळे, सेवा सोसायटी पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गटातील महिलानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात (भरमाणा ओमाना पाटील १९४२ च्या चलेजावच्या चळवळीत भूमिगत राहून कार्य. सव्वा वर्ष अंडरट्रायल राहून व पंधरा दिवस सक्तमजुरीची शिक्षा. रामचंद्र नाना गुरव व नाना मशाप्पा गुरव १९४२ साली भूमिगत. तीन महिने स्थानबद्ध. गुंडू लक्ष्मण कांबळे १९४२ च्या चलेजाव चळवळीत सहभाग. शंकर नाना गुरव १९४१ सालच्या वैयक्तिक सत्याग्रहात सहभाग. चार महिने सक्तमजुरीची शिक्षा. १९४२ साली चार वर्ष भूमिगत.  पार्वती शंकर गुरव २६ जानेवारी १९४४ रोजी सत्याग्रह केल्याबद्दल एक महिना साध्या कैदेची शिक्षा. 

           दुंडाप्पा हणमंत पाटील १९४१ सालच्या वैयक्तिक सत्याग्रहात सहभाग. चार महिने सक्त मजुरीची शिक्षा. पन्नास रुपये दंड व दीड वर्ष कच्ची कैद. बसवंत सुबराव चिगरी १९४२ सालच्या चलेजावच्या चळवळीत भूमिगत राहून कार्य. एक वर्ष नऊ महिने कच्ची कैद. बसवंत लक्ष्मण पाटील १९४२ साली भूमिगतांना आश्रय दिल्याबद्दल तीन महिने स्थानबद्ध. विठ्ठल गुंडू कांबळे १९३० साली जंगल सत्याग्रहाबद्दल सहा महिने शिक्षा) या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यांची प्रतिमा कायमस्वरूपी ग्रामपंचायत कार्यालयमध्ये लावण्यात आले. स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली. शाल श्रीफळ देऊन स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचे सन्मान करण्यात आला. 

          महिला मंडळाच्या स्त्रिया पारंपारिक वेशभूषेमध्ये उपस्थित होत्या. प्राथमिक शाळा विद्यार्थी व अंगणवाडी विद्यार्थी यांना दप्तर व गणवेश वाटप ग्रामपंचायत कडून करण्यात आले. एकूण आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.

          याप्रसंगी गावचे सरपंच संतोष कृष्णा पाटील, माजी उपसरपंच किरण पाटील, पोलीस पाटील बाळू व्हंकळी, आदर्श ग्रामसेवक दत्तात्रय नाईक, ग्रामपंचायत सदस्य सागर चिचणेकर, कल्याणी पाटील, विद्यामंदिराचे शिक्षक, तलाठी व इतर विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment