कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
वीज वितरण कंपनीचा निष्काळजीपणा शेतकरी महिलांच्या जीवावर बेतला होता. केवळ दैव बलवत्तर व ग्रामस्थांच्या दक्षतेमुळे त्या बचावल्या. माणगाव व बसर्गे (ता. चंदगड) येथील शिवारात विजेच्या तारा टेलिफोनच्या खांबाला चिकटल्यामुळे हा आपत्कालीन प्रसंग निर्माण झाला होता.
माणगाव येथील महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष महादेव सांबरेकर व उपसरपंच बाबुराव दुकळे हे आज दि. १६ रोजी सायंकाळी पाच वाजता माणगाव ते गौळवाडी इव्हनिंग वॉक साठी चालले असताना त्यांना सीमदेव मंदिर नजीक शेतातील टेलिफोनच्या खांबातून आवाज येत असल्याची जाणीव झाली. लक्षपूर्वक पाहिले असता शेजारून जाणारी विजेची तार या खांबाला घासल्यामुळे खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. खांब तापल्यामुळे त्यातून धूर व खालील पाण्यातून वाफा बाहेर पडत होत्या. प्रसंगावधान राखून दोघांनी तातडीने खांबापासून केवळ वीस फुटावर भात शेतात भांगलन करणाऱ्या बसर्गे येथील महिला साधना संजय पाटील व भागुबाई शंकर पाटील यांना दूर जाण्यास सांगितले.
मोहन होनगेकर यांच्या माध्यमातून विद्युत पुरवठा बंद केला. त्यानंतर टेलिफोन खांब दोरी लावून खाली पडला. यावेळी खांबाच्या जवळच पाच-सहा बेडूक, साप असे जलचर प्राणी शॉक लागून मेलेले दिसले. दोन्ही महिलांनीही भांगलण करत असताना आपल्या पायांना झिनझिन्या येत होत्या असे सांगितले. प्रसंगावधान राखून दोन महिलांचे जीव वाचवण्यास कारणीभूत ठरलेल्या महादेव सांबरेकर व बाबूराव दुकळे यांचे बसर्गे ग्रामस्थांनी आभार मानले. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यात विजेच्या तारांना स्पर्श करणारी झाडे व इतर खांब यांची पाहणी करून नागरिकांच्या जीवावरील धोका टाळावा अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment