संवेदनशीलता बोथट होत चाललेल्या समाजाला योग्य दिशा देण्याची गरज – डॉ. जी. पी. माळी, माडखोलकर महाविद्यालयात रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2022

संवेदनशीलता बोथट होत चाललेल्या समाजाला योग्य दिशा देण्याची गरज – डॉ. जी. पी. माळी, माडखोलकर महाविद्यालयात रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा

प्रा. जी. पी. माळी मार्गदर्शन करताना. व्यासपीठावर मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         "विशिष्ट विचारधारेने प्रेरित होऊन शिक्षण प्रसाराची वाटचाल ध्येयनिष्ठेने पुढे नेण्याचे काम मागच्या पिढीने केले.  कृषीप्रधान भारत देशाला शैक्षणिक चळवळीची आणि सामाजिक क्रांतीची नितांत गरज होती. आजच्या पिढीने ही धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेण्याची गरज आहे. आज  समाजात स्वार्थलोलुपता वाढत चालली आहे. संवेदनशीलता बोथट होत चाललेल्या समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे.  भोवतालची, नकारात्मकता दूर करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणात आहे. शिक्षण हेच या युगाचे सामर्थ्य व बलस्थान आहे." असे प्रतिपादन  माजी प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचे  प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  कार्यक्रमाचा प्रारंभ स्वागत गीताने झाला.

               यावेळी माजी रो. ह. यो. राज्यमंत्री भरमू पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले" सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून जन्मभर काम केले. सामाजिक जाणीव जपताना नैतिक बांधिलकी महत्त्वाची मानून काम केले. पुरोगामी विचारसरणीचा कृतिशील पुरस्कार केला. त्यामुळेच जनतेचे प्रेम लाभले.विशेष करून मुलींच्या  शिक्षणाची सोय व्हावी हे स्वप्न साकार झाले. तालुक्यातील रस्ते जलसिंचन, शिक्षण आणि आरोग्य यांचे प्रश्न जनतेच्या पाठिंब्यामुळेच सोडवता आले. पत्नीने पिछाडी संभाळली म्हणूनच मला सार्वजनिक जीवनात आघाडी घेता आली."

     यावेळी माजी प्राचार्य एस. के. सावंत, डॉ. एस. पी. बांदिवडेकर व विद्यमान प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांचा सपत्नीक सत्कार झाला. प्रा. एस. के. सावंत यांनी "अभावग्रस्त अवस्थेत महाविद्यालयाने विद्यार्थी व पालकांचा विश्वास संपादन केला. खडतर वाटचाल करून आजचा यशाचा टप्पा गाठला" असे सांगितले. माजी प्राचार्य डॉ. एस. पी. बांदिवडेकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी अविरत कष्ट करून महाविद्यालयाचा लौकिक वाढवता आला. याबद्दल समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रा. किसन कुराडे यांनी संघर्षापेक्षा समन्वयाचे सूत्र ध्यानात घेऊन भविष्यकालीन यशासाठी दूरदृष्टीने योजना आखण्याची गरज विशद केली. अध्यक्ष एस. आर. पाटील यांनी आजचा हा दिवस जसा भाग्याचा आहे. तसाच आत्मचिंतन करून शैक्षणिक धोरणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचा संदेश देणारा आहे, असे मत व्यक्त केले. 

     यावेळी वेदांत बेळगावकर, पूजा गावडे, सोनाली येळवटकर या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वागत करण्यात आले. प्रोफेसर पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. एम. एम. माने यांचा तर विद्या वाचस्पती (पीएच. डी.) पदवी बद्दल प्रा. डॉ. एस. एस. सावंत व डॉ. एस. डी. गावडे यांचा सत्कार करण्यात आला. वर्षा सावंत, अस्मिता बेर्डे, प्रणिता गावडे, वैशाली सावंत, प्रियांका सलाम, अंकिता देसाई, निकिता मेंगाणे, पूजा गावडे, रोहिणी मोहिते या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यापीठाची प्रोत्साहन शिष्यवृत्ती मिळविल्याबद्दल पूजा पाटील व नमिता मोटार यांचा सत्कार झाला. वेणुगोपाल पतसंस्थेने पूजा पाटील ला धनादेश प्रदान केला. महाविद्यालयाने अल्पावधीत केलेल्या नेत्रदीपक प्रगतीचे व सातत्याने गुणवत्ता वाढ व चढत्या श्रेणीने प्राप्त केलेल्या मूल्यांकनाचा आढावा प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी प्रास्ताविकातून घेतला. सूत्रसंचालन डॉ. एन्. एस. मासाळ व प्रा. एस. बी .दिवेकर यांनी केले. डॉ. पी. एल. भादवणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

            यावेळी कार्यक्रमास अशोक पाटील, एम. एम. तुपारे, आर. पी .बांदिवडेकर, ज. गा. पाटील, नगराध्यक्षा प्राची काणेकर, शांताराम पाटील, विक्रांत माडखोलकर, सचिन बल्लाळ, नारायण गडकरी, पी. एस. माळी, एम. टी. कांबळे, एम. एस. मुळीक, डॉ. एस. डी. गोरल, एस. व्ही. गुरबे, व्ही. डी. देसाई, एल. डी. कांबळे यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.  कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी कै.  र. भा . माडखोलकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले . रांगोळी स्पर्धेतील रांगोळी प्रदर्शनास भेट दिली. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने बहारदार करमणुकीचा कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम अत्यंत जल्लोषात व प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला.

No comments:

Post a Comment