सत्कार करताना मान्यवर. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
"प्रत्येक दगडात मूर्ती असतेच. मूर्तीवरील अनावश्यक थर बाजूला करण्याचे काम शिक्षण करते. शिक्षणाने प्रतिभा बाहेर येते. भारतीय शिक्षण संवेदनशील आहे सहानुभूती व सौहार्दाचे दर्शन घडवणारी आपली भारतीय संस्कृती महान आहे. विश्व एक विद्यापीठ आहे. शिकण्यासाठी सदैव सज्ज रहा. सर्व इंद्रिये उघडा. अनेक ध्वनी; अनेक रंग, प्राणी पक्षांचे, जीवसृष्टीचे निरीक्षण करा. जीवनचक्र न्याहाळा.
पाहिलात तरी पुन्हा एकदा निरखा, ऐकलात तरी पुन्हा एकदा पारखा. निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. तिला सदैव धार लावा. या जगात आपणच सर्वतोपरी नसून समाजावर अवलंबून आहोत याचे भान ठेवा. जीवनात श्रमाला प्रतिष्ठा द्या." असे मत सिद्धगिरी मठाचे पीठाधीश प. पू. श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी व्यक्त केले.
ते येथील विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. डॉ. एस. एस. घाळी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त अमृत महोत्सवी वर्षपूर्ती झालेल्या व्यक्तींच्या सन्मानप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती रत्नमाला घाळी होत्या.
याप्रसंगी कै. डॉ. घाळी यांच्या सानिध्यात विविध क्षेत्रात काम केलेल्या आणि अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती झालेल्या ५० मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
स्वागत आणि प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी केले. सहसचिव गजेंद्र बंदी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास उपाध्यक्ष अरविंदअण्णा कित्तुरकर, संचालक डॉ. शिवकुमार कोल्हापुरे, किशोर हंजी, प्राचार्य मंगलकुमार पाटील, प्राचार्य विजयकुमार चौगुले, व्ही. एस. शिंदे, डॉ. सुनील देसाई, सोमगोंडा आरबोळे, उदय जोशी, राजशेखर यरटी, बसवराज हंजी, बसवराज आजरी, मीनाताई कोल्हापुरे, राम पाटील यांच्यासह सर्व शाखेतील प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विध्यार्थी उपस्थित होते. सचिव अॅड. बी. जी. भोसकी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी पाटील आणि प्रा. तेजस्विनी खिचडी यांनी केले.
No comments:
Post a Comment