चंदगड तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांकडून सेंद्रिय खताची निर्मिती - प्रा. विक्रम पाटील यांच्या हस्ते वितरण, कोठे.......... - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2022

चंदगड तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांकडून सेंद्रिय खताची निर्मिती - प्रा. विक्रम पाटील यांच्या हस्ते वितरण, कोठे..........

विद्यार्थांनी बनविलेले सेंद्रीय खत


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           गुडेवाडी (ता. चंदगड) येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त हम सब बच्चे । आत्मनिर्भर भारत के।। हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय परिसरातील सुकलेला पालापाचोळा व शेण एकत्र करून त्यामध्ये गांडूळ सोडण्यात आले. त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात आली. संस्थेचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांच्या हस्ते या सेंद्रिय खताचे वितरण करण्यात आले.

                     प्रारंभी प्रास्ताविक मुख्याध्यापक जी. व्ही. गावडे यांनी करुन उपक्रमाची माहिती दिली. यावेळी प्रा. विक्रम पाटील यांनी स्वामी विवेकानंद विद्यालय राबवत असलेले उपक्रम समाजासाठी दिशादर्शक असून या विद्यालयातून भविष्यात उद्योजक तयार होतील असे गौरवोद्गार काढले. माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. पर्यावरणपूरक गणपती विसर्जन यासारख्या उपक्रमांचा प्रभाव समाजावर होत असल्याचे शाळा समिती अध्यक्ष निंगाप्पा आवडण यांनी सांगितले. सेंद्रिय खत निर्मिती मधून आलेले अनुभव आणि स्वनिर्मितीचा आनंद झाल्याचे विद्यार्थी धनाजी नाईक आणि सानिका पाटील यांनी व्यक्त केले. आपण घेतलेल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा, उपयोग दैनंदिन जीवनात, व्यवहारात झाला पाहिजे हा ज्ञानरचनावाद विध्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी तयार झालेल्या सेंद्रिय खताची विक्री विद्यार्थी करत आहेत. सदर उपक्रमातून तयार झालेल्या उत्पादनाचे वजन करणे, पॅकिंग, मार्केटींग, जाहिरात यांचा प्रत्यक्ष अनुभव विध्यार्थ्यांनी घेतला आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी उद्योजकांची बीजे शालेय जीवनात रुजविण्याचा प्रयत्न विद्यालय करत आहे.

      यावेळी शाळा समितीचे सदस्य एस. बी. पाटील, यु. एस. कपिलेश्वरी, एस. के. गावडे, प्रकाश नाईक, पुंडलिक पाटील, शशिकांत गावडे उपस्थित होते. सूत्रसंचालन एल. पी. पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment