शिवाजी पाटील यांना 'राष्ट्रीय संस्कृती भूषण' पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2022

शिवाजी पाटील यांना 'राष्ट्रीय संस्कृती भूषण' पुरस्कार

पद्मश्री डॉ. कोल्हे दांपत्याच्या हस्ते मानाचा पुरस्कार स्वीकारताना शिवाजी पाटील सोबत मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

         नागरदळे (ता. चंदगड) गावचे मुंबईस्थित सुपुत्र  कवी, साहित्यिक शिवाजी विष्णू पाटील यांना शामरंजन बहुउद्देशीय फाउंडेशन मुंबईच्या वतीने नुकतेच 'राष्ट्रीय संस्कृती भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ स्मिता कोल्हे दांपत्याच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

         एक हळव्या मनाचा कवी, गीतकार, अभिनेता, नाट्यनिर्माता, दिग्दर्शक अशा बहुआयामी भूमिकेत काम केलेल्या शिवाजी पाटलांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील उत्तुंग योगदानाची दखल पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली आहे. त्यांनी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात राहणाऱ्या 'चंदगडी' कलाकारांना एकत्र करून नाट्यसंस्कार संस्थेची निर्मिती केली. या संस्थेच्या माध्यमातून साहित्यिक स्वामीकार रणजित देसाई यांच्या बारी कादंबरीवर आधारित सबूद नाटकाची निर्मिती केली. या महानाट्याचे ते निर्माते व नाटकातील गीतांचे लेखक आहेत.

           बेळगाव येथील पुरस्कार वितरणाच्या भव्य दिव्य कार्यक्रमात मेळघाट डोंगर रांगांतील आदिवासी बांधवांसाठी आयुष्य वेचलेल्या समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ स्मिता कोल्हे दाम्पत्याच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय किर्तीचे शूटिंगबॉल प्रशिक्षक अशोक दाभोळकर, गोव्यातील प्रख्यात जादूगार प्रेमानंद, संमोहन उपचार तज्ञ दीपक बोडरे, सिने अभिनेत्री रिया पाटील, स्वाती पवार, संयोजक डॉ. बी. एन. खरात आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले. आभार कृष्णा बामणे यांनी मानले.

 

No comments:

Post a Comment