चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
तडशिनहाळ (ता. चंदगड) येथे बेकायदेशीररित्या कल्याण मटका घेताना राजाराम विष्णु पाटील( रा. तडशिनहाळ, ता. चंदगड), विलास कल्लाप्पा पाटील (रा. शिनोळी खूर्द, ता. चंदगड) व अंतोन रुजाय फर्नांडिस (रा. उचगाव, ता. जि. बेळगाव) या तिघांवर चंदगड पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्यांच्याकडील १ लाख ७ हजार ६१५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहिती अशी - तडशिनहाळ येथील कालवा नावाच्या शेताकडे जाणार्या रस्त्याकडेला कल्याण मटका घेत असल्याची माहीती चंदगड पोलिसाना मिळाली. त्यानुसार कारवाईसाठी चंदगड पोलीस या ठिकाणी गेले असता मटका घेणारा राजाराम पाटील याने पोलीसांची चाहूल लागताच धुम ठोकली, तर विलास कल्लाप्पा पाटील व अंतोन रुजाय फर्नांडिस हे मटका खेळणारे दोघेजण घटनास्थळी पोलीसांनी ताब्यात घेतले.
यावेळी एक लाख सहा हजार ५८० रुपये रोख, एक मोबाईल, पेन, कोरे कागद, प्लॅस्टिक डबा असा एकूण १ लाख ७ हजार ६१५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तीन आरोपींच्या विरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि हणमंत नाईक, पोहेकाॅ महेश बांबळे आदीनी ही कारवाई केली.
No comments:
Post a Comment