ओलम - हेमरस शुगर्सवर 23 हजार ऊस उत्पादकांचा विश्वास, बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात भरत कुंडल यांची माहिती, आठ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट, १५ ऑक्टोबरला हंगाम सुरू करणार - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2022

ओलम - हेमरस शुगर्सवर 23 हजार ऊस उत्पादकांचा विश्वास, बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात भरत कुंडल यांची माहिती, आठ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट, १५ ऑक्टोबरला हंगाम सुरू करणार


राजगोळी खुर्द : ओलम कारखान्याच्या अकराव्या बॉयलर प्रदीपन प्रसंगी कारखान्याचे युनिट हेड भरत कुंडल व अन्य मान्यवर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        ओलम (हेमरस) साखर कारखाना प्रशासनाने आत्तापर्यंत ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार, वाहतूकदार यांची बिले उपविभागात उच्चांकी व तत्परतेने आदा केल्यामुळेच कार्यक्षेत्रातील २३ हजार ऊस उत्पादकांनी विश्वास दिला आहे. या विश्‍वासार्हतेमुळेच ओलम कारखाना यंदा 8 लाख टन गाळपाचा टप्पा पार करील असा विश्वास कारखान्याचे युनिट हेड भरत कुंडल यांनी व्यक्त केला. 


         ते राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम ऍग्रो इंडिया प्रा. लि. साखर कारखान्याच्या (सन २०२२-२३) तेराव्या गळीत हंगाम बॉयलर प्रदीपन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

         अग्निप्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे युनिट हेड भरत कुंडल, मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील व अन्य मान्यवर यांच्या हस्ते झाला.

          यावेळी बोलताना कुंडल पुढे म्हणाले, ``गेल्या बारा वर्षांपासूनच्या यशस्वी वाटचालीनंतर आमची विश्वासार्हता अधिक दृढ झाली आहे. उत्पादन वाढीसाठी कारखान्यामार्फत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञांमार्फत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना वर्षभर निरंतर मार्गदर्शन सुरू आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन पुस्तिका वाटप करत आहोत.``

         नव्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवल्यामुळे आम्ही समाधानी आहोत. यंदा ओल म मध्ये  आणखी गुंतवणूक करून नवीन तंत्रज्ञनाचा वापर करण्यावर व्यवस्थापनाचा भर असेल, जेणेकरून दोन लाख मेट्रिक टन गाळप वरून सुरू झालेल्या कारखान्याचा भविष्यात 10 लाख मेट्रिक टन गाळप करण्याचा मानस असेल. ओलम व्यवस्थापन, शेतकरी व कामगार हे एकाच कुटुंबाचे घटक असल्याची भावना आम्ही ठेवल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

           कारखान्याची देखभाल दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून लवकरच ती पूर्ण होतील आणि येत्या 10 ऑक्टोबरला मोळी पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच 15 ऑक्टोबरपर्यंत कारखाना सुरु होईल अशी माहिती यावेळी मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली .

           यावेळी ऑपरेशनल हेड शशांक शेखर, को-जनरेशन हेड बी आर योगेशा, कामगार युनियन अध्यक्ष संतराम गुरव, गुंडू गावडे आदींनी मनोगते व्यक्त केली. एच.आर. विभागातील रमेश पाटील, गणपत पाटील, रणजित सरदेसाई, यासह हेमरस युनियनचे सर्व पदाधिकारी कार्यक्षेत्रातील शेतकरी, वाहतूकदार, कामगार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment