पार्ले येथे टस्कराकडून ऊस पिकाचे नुकसान, हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त, शेतकरी हवालदिल - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2022

पार्ले येथे टस्कराकडून ऊस पिकाचे नुकसान, हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त, शेतकरी हवालदिल

टस्कराने पार्ले परिसरात ऊस पिकांचे केलेले नुकसान 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड  तालुक्यात महिन्याभरापूर्वी आगमन झालेल्या जंगली हत्तीचा कळप तालुक्यातील उमगांव, नागवे, खा.गूडवळे, खामदळे, हेरे, वाधोत्रे, पार्ले  येथे स्थिरावला असून दिवसा जगल क्षेत्रात मुक्काम करुन रात्रीच्यावेळी जंगलक्षेत्राबाहेर पडून  लगतच्या शेत शिवारात हत्तीच्या कळपांकडून मोठया प्रमाणात पिकांचे नुकसान सूरू आहे.  शेतशिवारात सद्या  पोटरीला (पोसावण्याच्या स्थितीत)  आलेल्या भात पिक, पूर्ण वाढ झालेला ऊस नाचनी व केळी बाग या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. 

        हत्तीचा कळप भात आणि ऊस पिकांचे शिवारात घुसुन, खाऊन तुडवुन व लोळवुन मोडतोड करुन नुकसान करत आहे. काल रात्री पार्ले (ता. चंदगड) येथील राईचा माळ नावाच्या शेतात टस्कराने धुडगूस घालून शंकर कृष्णा गावडे या शेतकऱचा ३४ गुठ्यातील ऊसाचा फडशा पाडला. तर ऊसाभोवती लावलेले सोलार कुंपण व बॅटरीचेही नुकसान केले. वनविभागाकडुन नुकसानग्रस्त क्षेत्राची पहाणी करुन पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे. वनपाल दत्तापाटील, वनपाल बी. आर. भांडकोळी, वनरक्षक जी. एस. बोगरे, पी. एस. कुलाळ, वनसेवक मोहन तुपारे, बाळू बांदेकर, तुकाराम गुरव यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. हत्ती नेहमी येणाऱ्या वाटेवर जंगलाचे दिशेने मधमाशांचे आवाज करणारे स्पिकर बसवण्यात आले असुन हत्तीच्या कळपाला  जंगलक्षेत्रात रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत असे वनक्षेत्रपाल आवळे यांनी सांगितले. 

          हत्तीच्या कळपास रोखण्यासाठी व त्यावर पाळत ठेवण्यासाठी चार कर्मचाऱ्यांंचे गस्त पथक तयार करण्यात आले असून गस्त पथकाला फटाके, सुरबाण, मेगाफोन देण्यात आले आहेत. परंतु सद्या असलेले पावसाळी वातावरण आणि दाट धुके, अडचणीच्या वाटा यामुळे गस्त पथकास हत्तीला हुसकावून लावणे व पिकांत उतरण्यापासून रोखणे कठीण बनले आहे.

No comments:

Post a Comment