शिनोळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कोणत्याही चौकशीला तयार : सरपंच नितीन पाटील यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2022

शिनोळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कोणत्याही चौकशीला तयार : सरपंच नितीन पाटील यांची माहिती

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी खोटे - नाटे आरोप करून ग्रामपंचायत कारभाराची चौकशीची मागणी केली आहे. मात्र सर्व कारभार शासन नियमानुसार असून कोणत्याही चौकशीला तयार असल्याची माहिती  सरपंच नितीन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

        पत्रकात म्हटले आहे की, ``40 वर्षापासून असणारी सत्ता ग्रामस्थांनी  नाकारून शिवशाही युवा परिवर्तन विकास आघाडीला सत्तेचा कौल दिला. हा मोठा विश्वास ग्रामस्थांनी आमच्यावर टाकला आहे. गावातील सोसायटीतही सत्तांतर घडले आहे. काही दिवसात ग्रामपंचायत तसेच दूध संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने आता खोटे - नाटे आरोप करून गावकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे.         

          ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात औद्योगिक वसाहत असतानाही केवळ 4 ते 5 लाख रुपये कर जमा असे, मात्र सत्ता आमच्याकडे येताच गत 5 वर्षात पारदर्शी कारभारामुळे सुमारे 1 कोटी पर्यंत नेला आहे. विरोधकांनी 40 वर्षात सत्तेचा गैरवापर केल्याने  आता आम्हाला  ग्रामस्थांची साथ मिळत आहे. सर्व विकासकामे शासन नियमानुसार दर्जेदार विकासकामे होत आहेत. औद्योगिक वसाहतीत रस्ता करताना काहीजणांनी खोडा घातला मात्र ग्रामस्थांच्या सहकार्य मिळाले. औद्योगिक वसाहती मधील अतिक्रमण दूर केले. प्रलंबित असलेला चक्करलाईन रस्ताही मार्गी लावला, शाळेला साहित्य, शाळा खोली, नवीन इमारत बांधली आहे. 

           15 टक्के मागास निधीतून डॉ. आंबेडकर वस्तीमधील नागरिकांच्या मागणीप्रमाणे सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते व गटारिंचे कामे सुरुआहेत.  समाज मंदिर आकर्षक करण्याचे काम सुरू आहे. आमच्या  उल्लेखनीय कामामुळे 40 वर्षापासून विरोधकांच्या ताब्यात असणारी विकास सोसायटीमध्येही सत्तांतर घडले. त्यामुळे आता नजीकच्या काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत व दूध संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

           गावासाठी क्रीडांगण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असताना माझ्यावर न्यायालयीन खटला दाखल केला आहे. आता खोटे आरोप करून गावकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे, मात्र ग्रामस्थांचा आम्हाला मोठा पाठिंबा मिळत आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ग्रामस्थच विरोधकांना योग्य धडा शिकवतील. ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेल्या जुन्या इमारती स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, तसेच विरोधकांनी कलमेश्वर मंदिराचा हिशोबही तातडीने गावकऱ्यासमोर जाहीर करावा, अशी मागणीही प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

No comments:

Post a Comment