पृथ्वीला विनाशापासून वाचवण्याची जबाबदारी माणसांचीच - प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, चंदगड महाविद्यालयात ओझोन दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2022

पृथ्वीला विनाशापासून वाचवण्याची जबाबदारी माणसांचीच - प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, चंदगड महाविद्यालयात ओझोन दिन साजरा

चंदगड महाविद्यालयात ओझोन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. एस. व्ही. कुलकर्णी बोलताना. व्यासपीठावर इतर मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           'आपली पृथ्वी सध्या विनाशाच्या वाटेने वाटचाल करीत आहे. ओझोन वायू विरळ होत चालला आहे. भांडवलदार, उद्योजक पर्यावरणाच्या प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. अनावश्यक वाहनांचा अतिरेकी वापर, फ्रिज, ए. सी. अशी उपकरणे, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर यामुळे प्रदूषण वाढले आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा जरूरीपुरता विवेकी वापर केला पाहिजे. प्रदूषण रोखायला हवे. अन्यथा ओझोन थर विरळ झाल्यास सूर्याच्या अतिनील किरणामुळे त्वचारोग, कॅन्सर, मोतीबिंदू, पेशीतील बदल, प्रतिकारशक्तीचा अभाव अशा अनेक समस्या उद्भवतील व मनुष्य जातीचे अस्तित्वच धोक्यात येईल.' असे प्रतिपादन एस. व्ही .कुलकर्णी यांनी केले.

           ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील भूगोल विभागाने आयोजित केलेल्या ओझोन दिन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे होते. 

           अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. पी. आर. पाटील यांनी' पृथ्वी ही बहुरत्ना  वसुंधरा आहे. माणसाने आपले जीवन निसर्गाशी अनुकूल व संवादी पद्धतीने जगायला हवे, अंटार्टिका खंडावर ओझोन थराला प्रचंड छिद्र पडले ही घटना अंतर्मुख व्हायला भाग पाडणारी आहे. ओझोन थराचे महत्व आपण स्वतः जाणून घ्यावे व इतरांनाही सांगायला हवे. विज्ञानाचा अंतिम हेतू मानवाचे कल्याण हाच असून आपले भविष्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे .'असे प्रतिपादन केले. 

            प्रारंभी भूगोल विभाग प्रमुख समन्वयक प्रा. डॉ. एन. एस. मासाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. एम. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य पाटील यांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे अनावरण झाले. कार्यक्रमास प्रा. आर. के. तेलगोटे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment