वृद्ध आई-वडिलांना अडगळीत टाकणाऱ्यांची गय करणार नाही..! - प्रांताधिकारी वाघमोडे - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2022

वृद्ध आई-वडिलांना अडगळीत टाकणाऱ्यांची गय करणार नाही..! - प्रांताधिकारी वाघमोडे

कोवाड येथील कार्यक्रमात बोलताना उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे सोबत मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
आयुष्यभर ज्या आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून आपल्याला  'मोठे' केले त्यांना वृद्धापकाळात अडगळीत टाकणाऱ्या करंट्या चिरंजीवांची गय करणार नाही! असा इशारा गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिला. कोवाड, ता. चंदगड येथील रिद्धी सिद्धी अपार्टमेंट भूमिपूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. श्रीराम मंदिर कोवाड येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष जोशी होते.
    स्वागत अशोक मनवाडकर, नंदकुमार पाटील यांनी केले. प्रास्ताविक विश्वास रेडेकर यांनी केले यावेळी पुढे बोलताना वाघमोडे म्हणाले वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्यांत उच्चशिक्षित, उच्चपदस्थ व कमावत्या मुलांचा भरणा मोठा आहे पण माझ्याकडे आलेल्या तक्रारींत एकही शेतकरी मुलगा नाही. ज्यांची मुले वृद्धापकाळात संगोपन करत नाहीत अशा  आई-वडिलांनी सर्कल, तलाठी, पोलीस पाटील, पोलीस स्टेशन मार्फत, पत्राद्वारे किंवा साध्या मोबाईल वरून तक्रारीचा संदेश पाठवला तरी त्या आई-वडिलांना न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगितले. चंदगडचा भौगोलिक विस्तार मोठा व दुर्गम आहे. कोलिक, म्हाळुंगे पासून गडहिंग्लज व कामेवाडी, राजगोळी पासून चंदगड येथे  शासकीय कामासाठी गेलेल्या ग्रामस्थांची कामे शक्यतो एकाच फेरीत व्हावीत यासाठी आपण प्रयत्नशील आहे. त्यातही विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामी लागणारे सर्व प्रकारचे दाखले व ज्येष्ठ नागरिकांची कामे याबाबत कार्यालयातील कोणी अडवणूक केल्यास त्यांची गय करणार नाही असाही इशारा त्यांनी दिला. 
     ॲड. संतोष मळवीकर यांनी गडहिंग्लज उपविभागाच्या इतिहासात सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारा अधिकारी प्रथमच भेटला असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले. यावेळी कीर्तीकुमार पर्वतराव देसाई व अशोक व्यंकटराव देसाई- कोवाडकर, तहसीलदार विनोद रणवरे, श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, ब्रह्माकुमारी आजरा केंद्राच्या संचालिका संध्या बहनजी आदींची भाषणे झाली. यावेळी मंडल अधिकारी शरद मगदूम, तलाठी राजश्री प्रचंडी, ग्रामसेवक जी एल पाटील, केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, तंटामुक्त अध्यक्ष जोतिबा बागीलगेकर, परशुराम पाखरे, आकाश पाखरे, संतोष पाखरे, बी बी गव्हाळे, पुंडलिक चोपडे आदी मान्यवरांसह शिवसेना, श्रीराम सेना पदाधिकारी, कार्यकर्ते व  ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रणजीत भातकांडे यांनी केले. उमेश दळवी यांनी आभार मानले.No comments:

Post a Comment