क्रिएटिव्ह टीचर्स फोरम कडून जिल्ह्यात ४ थी, ७वी प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नसंच वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2022

क्रिएटिव्ह टीचर्स फोरम कडून जिल्ह्यात ४ थी, ७वी प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नसंच वितरण

कोवाड येथे प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नसंच वितरण प्रसंगी क्रिएटिव्ह टीचर्स फोरमचे सदस्य, सोबत केंद्रमुख्याध्यापक श्रीकांत पाटील, केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर, आप्पाराव पाटील, मुख्याध्यापक व शिक्षक.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          क्रिएटिव्ह टीचर्स फोरम कोल्हापूर यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नसंच पुस्तिका मोफत वितरण करण्यात आल्या. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या धरतीवर सध्या इयत्ता चौथी व सातवी साठी प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या तयारीसाठी प्रश्नसंच ची गरज ओळखून टिचर्स फोरमने संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविला. 

           प्रत्येक तालुकावार केंद्रशाळेतून पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. चंदगड तालुक्यात याचा लाभ इयत्ता चौथीच्या २०० व सातवीच्या ७० शाळांना झाला. चंदगड तालुक्यातील वितरण केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे करण्यात आले. यावेळी पुस्तिका घेऊन आलेले टीचर्स फोरमचे सदस्य दीपक जगदाळे, यशवंत चौगुले, बाबुराव काळुगडे, चंद्रकांत निकाडे, आप्पाराव पाटील यांचे स्वागत केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर यांनी केले. प्रास्ताविक आप्पाराव पाटील यांनी केले. यावेळी आलेल्या प्रतिनिधींनी प्रश्नसंचांचा शिक्षकांनी पुरेपूर वापर करावा, असे आवाहन केले. केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी आभार मानले. यावेळी विविध केंद्रांचे केंद्रप्रमुख, केंद्रमुख्याध्यापक व कोवाड केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

                  टीचर्स फोरमचे कार्य अनुकरणीय

             विजय एकशिंगे, दीपक जगदाळे, संजय कळके आणि प्रकाश ठाणेकर या ध्येयवेड्या शिक्षकांच्या संकल्पनेतून क्रिएटिव्ह टीचर्स फोरम कोल्हापूर हा शैक्षणिक व सामाजिक कार्य करणारा समूह उदयास आला. या समूहाने आजपर्यंत अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य, वाचनीय पुस्तके पुरवली आहेत. चांगले खेळाडू तयार व्हावेत म्हणून विविध खेळांचे मार्गदर्शन केले. हस्ताक्षर कार्यशाळा घेतल्या. सुट्टीच्या कालावधीत शिक्षकांच्या अनेक कार्यशाळा घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने टेक्नोसेव्ही विषय, नवीन शैक्षणिक धोरण, लेखकांच्या प्रत्यक्षात भेटी, समाजातील ध्येयवेड्या समाजसुधारकांच्या भेटी यांचा समावेश आहे. अनेक अभ्यास दौरे काढले.

        महापूर काळात गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्त, जेवण पुरवले. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अंगणवाडी, आशा सेविकांचा  सन्मान व मदत केली. गरीब कुटुंबांना अत्यावश्यक साहित्य पुरवले.

         कोरोना काळात शिक्षकांना ऑनलाईन अध्यापनाबाबत मार्गदर्शन केले. अत्यंत गरीब पण हुशार, होतकरू अशा ३४ विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन दिले. कोरोना नंतर नियमित शाळा सुरू झाल्या आणि ५-१० किमी अंतरावरून पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणारे विशेषतः मुलींचे हाल पाहून त्यांना मोफत सायकल वितरण सुरू केले. आजअखेर ६५ सायकलींचे मोफत वितरण पूर्ण झाले आहे.

             शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी समुहाने चंग बांधला आणि प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नपत्रिका संच तयार केले. हे चौथी आणि सातवी चे स्वतंत्र संच पुस्तिका रुपाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि मनपा शाळांना अगदी विनामूल्य वितरीत केले जात आहेत. यांसह विविध शैक्षणिक उपक्रम हा समूह पदरमोड करून, अनेकांचे सहकार्य घेऊन करीत आहे. या समूहात सारे समान पातळीवर काम करत आहेत. अध्यक्ष, सचिव अशी पदे नाहीत. पण ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉ. सुनीलकुमार लवटे, शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा विभाग प्रमुख डॉ. बी. एम. हिर्डेकर, माजी शिक्षण सहसंचालक आदरणीय संपतराव गायकवाड यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळेच आज शेकडो शिक्षक बंधूभगिनी या समूहात अगदी तन, मन, धन अर्पण करुन काम करत आहेत. यातील अनेक शिक्षक आज विविध क्षेत्रात नामवंत आहेत.

            या समूहाचा उद्देश स्पष्ट आहे, तो म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थी शिकला पाहिजे, स्पर्धेत टीकला  पाहिजे आणि निकोप समाज घडला पाहिजे.

No comments:

Post a Comment