संबळ-तुंबळ' गोंधळ गीताला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2022

संबळ-तुंबळ' गोंधळ गीताला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद


चंदगड/प्रतिनिधी
शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी यांची निर्मिती व संगीतकार ओंकार सुतार यांची प्रस्तुती असलेल्या 'संबळ - तुंबळ' या देवी अंबाबाईच्या गोंधळ गीताला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत हजारो लोकांनी 'संबळ - तुंबळ' हा गोंधळ पाहिला आहे. या गीताच्या पोस्टरचे उद्घाटन कोल्हापूरच्या श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते बुधवारी (दि. २८) श्री तुळजाभवानी मंदिर, जुना राजवाडा, भवानी मंडप येथे झाले. या कार्यक्रमाला माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर व डॉ. धनंजय लाड यांची विशेष उपस्थिती होती. 'या पावसानं मन' गीताच्या यशानंतर या गोंधळाची प्रस्तुती करणारे येथील संगीतकार गायक ओंकार सुतार, प्रायोजक डॉ. धनंजय लाड, गीतकार सदानंद पाटील, गायिका कीर्ती आंबेकर, संगीत सहायक रोहित कांबळे यांचा सत्कार युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते महालक्ष्मीची प्रतिमा व कोल्हापुरी गूळ देऊन करण्यात आला. तसेच त्यांनी या कलाकारांच्या कलेचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. मनीषा नायकवडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. आझाद नायकवडी यांनी आभार मानले. राधानगरी तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी एकत्र येऊन तयार केलेल्या या गोंधळाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांची संख्या वाढेल असा विश्वास डॉ.नायकवडी यांनी व्यक्त केला.


No comments:

Post a Comment