संग्रहित छायाचित्र |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
गोव्यातून महाराष्ट्रात दारू आणणे आता चांगलेच महागात पडणार आहे. महाराष्ट्र व अन्य राज्यातील पर्यटक महाराष्ट्र मार्गे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने गोवा येथे जात असतात. तिथे स्वस्तात मिळणारी दारू येताना सोबत आणण्याचा प्रयत्न अनेक अतिउत्साही पर्यटकांकडून होत असतो.
काही मंडळी तर यासाठीच वारंवार 'गोवा पर्यटन' करतात. पण येताना दारू आणताना तिनदा दोषी आढळल्यास अशा व्यक्तींवर मोक्का अर्थात 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिला आहे. तशा कार्यवाहीच्या सूचना संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे यापुढे गोव्यातून दारू तस्करी किंवा पर्यटनाच्या निमित्ताने जाऊन येताना असे 'पार्सल' आणने महागात पडू शकते. या नव्या आदेशाने हेतू पुरस्सर 'गोव्याची ट्रीप' करणाऱ्यांची मात्र पंचायत झाली आहे.
No comments:
Post a Comment